पोलीस पाटील हे पोलिसांचे एक अंग; उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना पुरस्कार – पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी

महर्षि डिजीटल न्यूज/सागर खरात
अकलूज : “पोलीस पाटील हे पोलिसांचे एक महत्त्वाचे अंग असून, गावपातळीवरील कायदा व सुव्यवस्था राखण्यात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पोलीस पाटलांना विशेष पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,” अशी घोषणा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केली.
येथील कांतीलाल सांस्कृतिक भवन येथे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या वतीने आयोजित पोलीस पाटील कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यशाळेत माळशिरस तालुक्यातील शेकडो पोलीस पाटील उपस्थित होते. पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी पोलीस पाटलांची जबाबदारी, त्यांचे कार्यक्षेत्र आणि त्यांच्यासमोरील आव्हाने याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी माझी नायब तहसीलदार उत्तमराव पवार, कृषी विशेषज्ञ विद्यासागर कोळी, पोलीस नाईक दत्ता खरात, शेती मार्गदर्शिका गौरी गावडे यांनी उपस्थित राहून कार्यशाळेसाठी मार्गदर्शन केले.
पुढे बोलताना पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी म्हणाले, “पोलीस पाटील हे स्थानिक प्रशासन व पोलिसांच्या मधला महत्त्वाचा दुवा आहेत. त्यांच्या योगदानामुळे गावपातळीवर कायदा-सुव्यवस्थेचे पालन शक्य होते. महिलांच्या सुरक्षे बरोबरच गावात महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे गरजेचे आहे तसेच ग्राम सुरक्षा दल सक्रिय केले पाहिजे,”असेही कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर म्हणाले, पोलीस पाटील हे पद लहान नाही, नकारात्मकता सोडून कामाला लागा, चांगलं काम करा गावाचा विकास होईल असे सांगतानाच त्यांनी सायबर गुन्हेगारी विषयी उदाहरणासह सविस्तर माहिती दिली.
या कार्यशाळेत कायदा-सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस पाटलांच्या भूमिका, त्यांच्या जबाबदाऱ्या, तसेच नवीन सुधारित नियमांविषयी चर्चा करण्यात आली. तसेच सेंद्रिय शेती लोकसहभागातून जलसंधारण यावर विद्यासागर कोळी यांनी मार्गदर्शन केले. तसेच उत्तमराव पवार यांनी पोलीस पाटलांच्या जबाबदाऱ्या व कार्य याविषयी मार्गदर्शन केले. गौरी गावडे यांनीही शेतीविषयक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
कार्यशाळेच्या शेवटी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या काही पोलीस पाटलांचा सत्कारही करण्यात आला. तसेच पोलीस पाटील यांना ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते पोलीस पाटील रजिस्टर व दैनंदिनचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.
कार्यशाळेमुळे पोलीस पाटलांमध्ये उत्साह संचारला असून, आपल्या कार्याचा योग्य सन्मान होत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. सूत्रसंचालन औदुंबर बुधावले यांनी केले.