जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले नं.४ अकलूज येथे बालिका दिन साजरा..!

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : ३ जानेवारी माय सावित्रीचा जन्मदिवस हा दिवस “बालिका दिन” म्हणून साजरा केला जातो. आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले नं.४ अकलूज शाळेत देखील हा बालिका दिन साजरा करण्यात आला.
नायगाव जि.सातारा येथे झगडे पाटील घराण्यात जन्माला आलेल्या सावित्रीमाईंनी सामाजिक सुधारणांचा पाया घालताना आयुष्यभर कर्मठ प्रतिगामी आणि समाजकंटकांच्या कुकर्माशी झगडून बहुजन समाजातील गोरगरिबांच्या अंगणी फुलांचा सडा टाकला. माहेरचे झगडे आणि सासरच्या फुले या दोन्ही आडनावांभोवती आपल्या कर्तुत्वाची सुंदर रांगोळी रेखाटली.
फुले दांपत्याने जातीभेद, लिंगभेद नष्ट करून शिक्षणाची गंगा सर्वसामान्यांच्या झोपडी पर्यंत पोहचवली.म्हणूनच आज सर्वच क्षेत्रात स्त्रिया सर्वोच्च पदावर विराजमान झाल्या आहेत.असे गौरवोद्गार ललितागौरी राणे यांनी आपल्या भाषणातून काढले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सतिश जाधव यांनी केले.तर आभार नितीन बनकर यांनी मानले.



