एस.टी. बसमध्ये महिला कंडक्टरला मारहाण ; न्यायालयाचा कडक निकाल, आरोपींना कारावास

महर्षि डिजीटल न्यूज / सागर खरात
अकलूज : सांगोला एस.टी. आगारात वाहक म्हणून कार्यरत असलेल्या सौ. दिपाली अनिल अष्टेकर यांच्यावर शासकीय कर्तव्य बजावत असताना शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करणाऱ्या दोन आरोपींना माळशिरस जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवत सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
दिनांक ०२ फेब्रुवारी २०१८ रोजी सायंकाळी सांगोला–अकलुज ही एस.टी. बस अकलुज नवीन बसस्थानकातील फलाट क्रमांक ३ वर उभी होती. बसमध्ये प्रचंड गर्दी असल्याने वाहक सौ. दिपाली अष्टेकर यांनी प्रवाशांना बसमध्ये जागा नसल्याची माहिती दिली. यावेळी एका तरुणाने आक्षेपार्ह व अपमानास्पद वक्तव्य करत बसमध्ये चढत वाहकास शिवीगाळ व दमदाटी केली. काही वेळाने तो बसमधून उतरून गेला.
बस मार्गस्थ असताना त्या दोघांपैकी एकाने बस थांबविण्याची मागणी केली. वेळापूर येथे जायचे असल्याचे सांगितल्यावर वाहक अष्टेकर यांनी पुन्हा बसमध्ये जागा नसल्याचे सांगितले असता आरोपींनी पुन्हा शिवीगाळ सुरू केली. यावेळी एका आरोपीने वाहकाच्या दोन्ही हातांवर मारहाण केली तर दुसऱ्याने हात व गळ्यावर मारले. चालक तानाजी निवृत्ती केंगार, प्रवासी महेश भागवत पावसे तसेच इतर प्रवाशांनी मध्यस्थी करून भांडण सोडविले.
यानंतर आरोपींना वाहतूक नियंत्रक कक्षात नेऊन अकलुज पोलिसांना माहिती देण्यात आली. आरोपींची नावे गणेश कृष्णदेव पवार व योगेश पोपट गोडसे (दोघे रा. बाभुळगाव, ता. माळशिरस) अशी निष्पन्न झाली. या प्रकरणी वाहक सौ. दिपाली अष्टेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून अकलुज पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार बाबासाहेब भातुंगडे यांनी करून आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीदरम्यान फिर्यादी, साक्षीदार सूर्यकांत नागण्णा सलगर, महेश भागवत पावसे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील नरुटे तसेच तपासी अधिकाऱ्यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.
या सर्व पुराव्यांच्या आधारे एल. डी. हुली, जिल्हा व सत्र न्यायाधीश, माळशिरस यांनी दोन्ही आरोपींना भा.द.वि. कलम ३५३ अन्वये २ वर्षे सश्रम कारावास व २,००० रुपये दंड, भा.द.वि. कलम ३३२ अन्वये २ वर्षे सश्रम कारावास व २,००० रुपये दंड तसेच भा.द.वि. कलम ५०४ अन्वये ६ महिने सश्रम कारावास व १,००० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
या प्रकरणात संतोष वाळके, उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलुज उपविभाग तसेच निरज उबाळे, पोलीस निरीक्षक, अकलुज पोलीस ठाणे यांनी मार्गदर्शन केले. सरकारी वकील म्हणून संग्राम एस. पाटील व शांतीनाथ तात्या मेंढेगिरी यांनी काम पाहिले, तर कोर्ट पैरवीसाठी पोलीस हवालदार रियाज तांबोळी व हरीष भोसले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
हा निकाल शासकीय कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांविरोधात कठोर संदेश देणारा ठरला आहे.



