जुन्या-नव्या भाजपाचा बसला मेळ; माजी आमदारांची मात्र होणार घालमेल…?

महर्षि डिजीटल न्यूज/सागर खरात
अकलूज : माळशिरस तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत घडामोडी सध्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत. भाजपमध्ये जुने आणि नवे गट यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होत चालला आहे. “जुन्या-नव्या भाजपाचा बसला मेळ” असे जरी म्हटले जात असले तरी प्रत्यक्षात हा मेळ काहीसा विसंगत आणि अस्थिर दिसत आहे. याला कारण माजी आमदार राम सातपुते यांचा दोन्ही गटांमध्ये असलेला वी संवाद मानला जात आहे. त्यामुळे माळशिरस तालुक्यात भाजपाच्या शाखांचे उद्घाटन जरी लक्ष्मीदर्शनाच्या जोरावर जोरदार होत असले तरी माजी आमदारांच्या भविष्यासंबंधी उलट-सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राम सातपुते यांच्याकडून वापरली गेलेली भाषा अनेकांना रूचलेली नाही विशेष म्हणजे यामध्ये त्यांच्याच पक्षातील अनेक नेत्यांचा समावेश आहे. शिवाय पक्षातीलच ज्येष्ठ नेत्यांना त्यांच्याकडून दिली जाणारी वागणूक, गटबाजी आणि मतभेद यामुळे स्थानिक राजकारण ढवळून निघाले आहे. भाजपमध्ये जुने आणि नव्या पिढीतील नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दरी पडत चालली असून, माजी आमदार राम सातपुते हे या संघर्षाच्या केंद्रस्थानी असल्याचे बोलले जात आहे.
भाजपमध्ये नवीन नेतृत्व उभे राहत असताना, राम सातपुते यांचा प्रभाव कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पक्षाने नवीन पिढीच्या नेत्यांना संधी देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सातपुते समर्थकांमध्ये काहीशी अस्वस्थता पसरली असल्याची चर्चा आहे. गेल्या काही महिन्यांत पक्षातील वरिष्ठ स्तरावरही काही नवे चेहरे समोर आले आहेत, ज्यांच्याकडे अधिक जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत. यामुळे राम सातपुते यांना वेगळाच संघर्ष करावा लागत असल्याची चर्चा पक्षांतर्गत होताना दिसत आहे.
गेल्या आठवड्यातच भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव पदी निवड झालेल्या सुरज मस्के यांचा सर्व वरिष्ठ नेत्यांनी जाहीर सत्कार केला. परंतु एकेकाळी युवा मोर्चाच्या मोठ्या पदावर असलेल्या माजी आमदार राम सातपुते यांनी मात्र सुरज मस्के यांच्याकडे कानाडोळा केला. सर्वात गंभीर बाब म्हणजे सुरज मस्के यांची निवड रद्द करण्यासाठी ही माजी आमदारांनी प्रयत्न केल्याची चर्चा पक्षाच्या गोटात सुरू असल्याचे ऐकायला मिळत आहे. त्यामुळे आपल्याच पक्षातील नेत्यांवर गंडांतर आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या माजी आमदारांबाबत पक्षांतर्गत प्रचंड नाराजी दिसू लागली आहे.