जयसिंह चौक–कर्मवीर चौक रस्त्याला खड्ड्यांनी ग्रासले ; अकलूज नगरपरिषदेच्या वतीने बांधकाम विभागाला निवेदन

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : अकलूज नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा रेश्माताई अडगळे व उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पाटील यांची भेट घेऊन शहरातील खराब झालेल्या मुख्य रस्त्यांच्या तात्काळ दुरुस्तीसंदर्भात सविस्तर निवेदन सादर केले.
अकलूज शहरातील जयसिंह चौक ते गांधी चौक ते कर्मवीर चौक, तसेच प्रतापसिंह चौक ते काळा ओढा, माळेवाडी अकलूज (टाटा शोरूम परिसर) या अत्यंत वर्दळीच्या मार्गांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून त्यामुळे वाहनधारक व पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पावसामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली असून अपघातांची शक्यता वाढली आहे.
या पार्श्वभूमीवर सदर रस्त्यांवर तात्काळ डागडुजी करून कायमस्वरूपी दुरुस्तीची कार्यवाही हाती घ्यावी, अशी ठाम मागणी नगराध्यक्षा व उपनगराध्यक्षांनी निवेदनाद्वारे केली. यावेळी कार्यकारी अभियंता पाटील यांनी सदर प्रश्नाची गंभीर दखल घेत लवकरात लवकर रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
नागरिकांच्या सुरक्षिततेसह सुकर व सुरक्षित वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी अकलूज नगरपरिषद सदैव कटिबद्ध असल्याचे यावेळी रेश्माताई अडगळे व शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले.



