वेळापूर येथील वादग्रस्त पोलीस अधिकारी भाऊसाहेब गोसावी यांची अखेर बदली

महर्षि डिजीटल न्यूज/सागर खरात
अकलूज : वेळापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले वादग्रस्त पोलीस अधिकारी भाऊसाहेब गोसावी यांची अखेर बदली करण्यात आली आहे. सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार त्यांची बदली स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण येथे करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून भाऊसाहेब गोसावी यांच्या कार्यपद्धतीबाबत स्थानिक पातळीवर नाराजी व्यक्त होत होती. विविध प्रकरणांतील हाताळणी, तक्रारींकडे दुर्लक्ष व प्रशासकीय बाबींवरून त्यांच्यावर टीका होत होती. या पार्श्वभूमीवर राजकीय स्तरावरही हा मुद्दा गाजला होता.
दरम्यान, या प्रकरणी खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार उत्तमराव जानकर यांनी आक्रमक भूमिका घेत पोलीस स्टेशन वेळापूर समोर आंदोलन केले होते. या आंदोलनामुळे हा विषय जिल्हास्तरावर चर्चेचा ठरला होता.
याशिवाय आमदार उत्तमराव जानकर यांनी विधानसभेतही या अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत वारंवार आवाज उठवला होता. त्यामुळे प्रशासनावर दबाव वाढला होता.
अखेर पोलीस प्रशासनाने बदलीचा निर्णय घेतल्याने वेळापूर परिसरात या घडामोडीची जोरदार चर्चा सुरू आहे. स्थानिक नागरिकांनीही या निर्णयाचे स्वागत केले असून पुढील काळात पोलीस प्रशासन अधिक पारदर्शक व जबाबदारीने काम करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या बदलीमुळे वेळापूर पोलीस ठाण्यात नवीन अधिकारी नियुक्त होणार असून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पुढील पावले काय असतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



