जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुली क्रमांक ३, अकलूज येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त बालिका दिन उत्साहात साजरा

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : “सोसूनी अनंत यातना, शिकवलेस तू स्त्रियांना; धन्य होतो आम्ही, तुझी थोरवी गाताना…”
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा बालिका दिन आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुली क्रमांक ३, अकलूज येथे उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रभात फेरीने करण्यात आली. या प्रभात फेरीत “लेक वाचवा–लेक शिकवा”, “मुलींना शाळेत पाठवा”, “आपली घरे स्वच्छ ठेवा”, “मुलगी शिकली, प्रगती झाली” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
यानंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुली क्रमांक २ च्या मुख्याध्यापिका अंगुले मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर छोट्या ‘सावित्री’ विराजमान झाल्याने कार्यक्रमास विशेष भावनिक रंग चढला.
यावेळी विद्यार्थिनी अक्षरा गायकवाड हिने सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ओवी सादर केली. तसेच विद्यार्थिनींनी त्यांच्या कार्यावर आधारित भाषणे करून स्त्री शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.
कोरबू मॅडम यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर विचार मांडत “बेटी हूँ मैं बेटी” या गीताचे सुमधुर गायन केले. बळवंतराव मॅडम यांनीही आपले प्रेरणादायी विचार व्यक्त केले. ‘मी सावित्री बोलते’ या भूमिकेतून सुजाता हिने सादर केलेले मनोगत उपस्थितांचे लक्ष वेधून गेले.
कार्यक्रमाच्या अनुषंगाने लिंबू-चमचा, रांगोळी आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी आकर्षक फलक लेखन समीर कोरबू सर व करीना मॅडम यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहिते सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. कोळी मॅडम यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक कोरे सर, नागणे सर, मोहिते सर, कोरबू सर, कोळी मॅडम, कोरबू मॅडम, जाधव मॅडम, अंगुले मॅडम, राऊत सर, शेख सर, गायकवाड सर, अडाणे मॅडम, बांगी मॅडम, बळवंतराव मॅडम यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
बालिकांच्या शिक्षणातून समाज परिवर्तनाचा संदेश देणारा हा कार्यक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.



