जातीवाचक शिवीगाळ व मारहाणीचा आरोप ; हरी विठ्ठल पालवे याच्यासह तिघांवर गुन्हा दाखल

महर्षि डिजीटल न्यूज
माळशिरस : माळशिरस तालुक्यातील पुणे–पंढरपूर रोडवरील सालगुडे पाटील यांच्या घरासमोर, सदाशिवनगर माळशिरस येथे लक्ष्मी देवी मंदिराच्या ठिकाणी सुरू असलेल्या कामाच्या दरम्यान वादातून जातीवाचक शिवीगाळ व मारहाणीची घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी माळशिरस पोलीस ठाण्यात हरी विठ्ठल पालवे (रा. पुरंदवडे, ता. माळशिरस) याच्यासह तीन अज्ञात इसमांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत दादा तुकाराम खुडे (वय ४० वर्षे, रा. मांडवे, ता. माळशिरस, जि. सोलापूर ग्रामीण) यांनी माळशिरस पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार हे जे.एम. म्हात्रे कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून कार्यरत असून सदर ठिकाणी लक्ष्मी देवी मंदिराचे काम सुरू होते.
तक्रारीनुसार, शुक्रवार दिनांक ०९/०१/२०२६ रोजी सकाळी १०.१५ ते सायंकाळी ०६.०० वाजण्याच्या सुमारास हरी विठ्ठल पालवे हा तेथे आला व मंदिराचे काम बंद असल्याचे सांगत वाद घालू लागला. यावेळी त्याने तक्रारदारास जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच तक्रारदाराच्या मुलीस दुखापत होईल अशी परिस्थिती निर्माण करून दमदाटी करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या घटनेदरम्यान हरी विठ्ठल पालवे याच्यासोबत असलेल्या तीन अज्ञात इसमांनीही शिवीगाळ व धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेनंतर उपचार घेण्यामुळे तक्रार दाखल करण्यात विलंब झाल्याचे तक्रारीत नमूद असून, दिनांक १०/०१/२०२६ रोजी माळशिरस पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
या प्रकरणी माळशिरस पोलीस ठाण्यात FIR क्रमांक 0008/2026 नुसार
भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 115(2), 352, 351(2), 3(5) तसेच
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, 1989 अंतर्गत कलम 3(1)(r), 3(1)(s), 3(2)(va) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.



