शंकर सहकारी साखर कारखान्याची सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी भानुदास सालगुडे व राहुल ढेरे यांना न्यायालयाचा 50 हजाराचा दंड

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : श्री शंकर सहकारी साखर कारखाना, त्यांचे चेअरमन व संचालक मंडळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर प्रसारित करून सभासदांची दिशाभूल केल्याप्रकरणी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, माळशिरस, जिल्हा सोलापूर यांनी भानुदास सालगुडे व राहुल ढेरे यांच्यावर ₹50,000/- दंड तसेच 9% वार्षिक व्याजाने संपूर्ण रक्कम वसूल होईपर्यंत भरण्याचा आदेश दिला आहे.
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याविषयी चुकीची माहिती पसरवून संस्थेच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून कारखान्याच्या वतीने न्यायालयात दावा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने सदर मजकूर हा बदनामीकारक आणि दिशाभूल करणारा असल्याचे मान्य करत दोघांवर दंड ठोठावला.
न्यायालयाच्या या निर्णयामुळे सोशल मीडियाचा गैरवापर करून कोणत्याही संस्थेची अथवा व्यक्तीची बदनामी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना धडा मिळाला आहे. कोणतीही वस्तुनिष्ठ माहिती नसताना सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट करणे कायदेशीरदृष्ट्या गंभीर परिणाम करणारे ठरू शकते, असेही या निर्णयावरून स्पष्ट झाले आहे.