माळशिरस ग्रामीण रुग्णालयात ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्याची आमदार उत्तमराव जानकर यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : माळशिरस तालुक्यातील रुग्णसेवा अधिक सक्षम करण्यासाठी माळशिरस ग्रामीण रुग्णालयात ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्याची मागणी आमदार उत्तमराव जानकर यांनी आरोग्यमंत्री प्रकाशराव आबिटकर यांच्याकडे केली आहे. या सेंटरमुळे अपघातग्रस्त आणि आपत्कालीन परिस्थितीत असलेल्या रुग्णांना तातडीची वैद्यकीय सेवा मिळणार आहे.
माळशिरस तालुका हा मोठ्या महामार्गांशी जोडलेला असल्याने येथे अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. यामुळे गंभीर जखमी रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत मिळण्यासाठी ट्रॉमा केअर सेंटर आवश्यक आहे. सध्या गंभीर जखमींना सोलापूर किंवा पुणे येथील मोठ्या रुग्णालयांमध्ये हलवावे लागते, त्यामुळे वेळेत उपचार मिळत नाहीत आणि अनेक रुग्णांचा जीव जातो.
आमदार जानकर यांनी आरोग्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात, माळशिरस तालुक्यामधून भव्य चार पदरी श्री. संत तुकाराम महाराज पालखी मार्ग व श्री.संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग हे झालेली आहे. तसेच तालुक्यामध्ये इतर राज्य महामार्गाचे कामे झालेली आहेत सदरचे महामार्ग हे अद्यावत पद्धतीने असल्यामुळे या महामार्गावरती तसेच या तालुक्यातील व शेजारील ४-५ तालुके व शेजारील दोन जिल्ह्यांमधील (पुणे व सातारा) महामार्गावर अपघातग्रस्त रुग्ण आढळून येतात. सदर अपघातामध्ये बऱ्याच रुग्णांना गंभीर स्वरूपाच्या इजा होऊन संबंधीत रुग्णांच्या जीवावर बेतू शकते.
यास्तव संबंधित रुग्णांना तातडीच्या व अपघात संबंधी जास्तीच्या सेवा (ट्रॉमा केअर) तातडीने व तात्काळ उपलब्ध झाल्यास संबंधित रुग्णांचा जीव वाचू शकतो. वरील सर्व बाबींचा विचार करता माळशिरस तालुका व शेजारील तालुक्यामध्ये शासकीय अद्यावत ट्रॉमा केअर सेंटर सध्य परिस्थितीत उपलब्ध नाही. या रुग्णालयामध्ये शासकीय अध्यावत ट्रॉमा केअर सेंटर सुरू झाल्यास, त्यांचा लाभअपघातग्रस्त रुग्णांना मोठ्या प्रमाणात होणार आहे सदर ट्रॉमा केअर सेंटर सुरू होण्याबाबत आपल्या स्तरावर योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली आहे.