Uncategorized

प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवलेल्या अकलूज बसस्थानकाला उतरती कळा ; ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे स्वच्छतेची व प्रतिष्ठेची घसरण; घाणीचे साम्राज्य, प्रवाशांना दुर्गंधीचा सामना

महर्षि डिजीटल न्यूज / सागर खरात
अकलूज : सोलापूर जिल्ह्यातील अकलूज बसस्थानकाने उत्कृष्ट व्यवस्थापन व स्वच्छतेसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले होते. मात्र, सध्या या बसस्थानकाची स्थिती पाहता त्याची दुरवस्था उघड झाली आहे. ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण बसस्थानक अस्वच्छतेच्या विळख्यात सापडले आहे. प्रवाशांना बसस्थानकाच्या विविध भागांतून दुर्गंधीचा सामना करावा लागत असून, कचर्‍याचा ढिग व सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

अगदी काही महिन्यापूर्वींच अकलूजचे आगार व्यवस्थापक प्रमादे शिंदे यांच्या पुढाकारामुळे व लोकसहभागामुळे अकलूजचे नवीन बसस्थानक चकाचक झाले. बसस्थानकाची स्वच्छता, उत्कृष्ट नियोजन, टापटीपपणा पाहून पुणे विभागात अकलूज बसस्थानकाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिकही मिळाले परंतु व्यवस्थापकांनी घेतलेल्या कष्टाला हरताळ फासण्याचे काम ठेकेदारामार्फत झाले असून अवघ्या काही महिन्यातच बसस्थानकाला उतरती कळा लावलेली दिसत आहे. बसस्थानकाच्या परिसरात साचलेला कचरा आणि स्वच्छतागृहांमधील अस्वच्छता ही ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचे उदाहरण आहे.

सस्थानकातील विविध भागांमध्ये कचरा साचलेला दिसत आहे. स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली असून त्याठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. प्रवाशांसाठी या ठिकाणी थांबणे अशक्य होत आहे. पाणी पिण्याच्या ठिकाणी, कोपर्‍या कोपर्‍यात थुंकीचे डाग, प्लास्टिक आणि खाद्यपदार्थांचे अवशेष यामुळे परिसराला गलिच्छ स्वरूप प्राप्त झाले आहे. बसस्थानकाच्या स्वच्छतेची जबाबदारी एका खासगी ठेकेदाराला देण्यात आली आहे. मात्र, स्वच्छता व्यवस्थापनात वारंवार उणीव राहिल्यामुळे बसस्थानक प्रशासनावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. नियमित स्वच्छता होत नसल्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

oplus_2

प्रवाशांनी या परिस्थितीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. पुरस्कार मिळवलेले बसस्थानक अशी ओळख असलेल्या अकलूज बसस्थानकाची ही अवस्था लाजिरवाणी आहे, असे एका प्रवाशाने सांगितले. स्थानकावर स्वच्छतेचा अभाव असल्याने प्रवाशांना इतर सुविधाही मिळत नाहीत. याबाबत स्थानिक प्रशासनाकडे विचारणा केली असता या परिस्थितीची दखल घेऊन वरीष्ठांकडे ठेकेदारावर कारवाई करण्याबाबत विनंती करण्याबाबत आणि बसस्थानकाची स्वच्छता सुरळीत करण्यासाठी आवश्यक पावले उचलली जातील, अशी माहिती आगार प्रमुखांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!