Latest News

श्री. शंकर सहकारी साखर कारखान्याचा ऐतिहासिक निर्णय — कारखान्याच्या इतिहासात प्रथमच ऊसाला ३०२५ रुपयांचा पहिला हप्ता

महर्षि डिजीटल न्यूज / सागर खरात 

सदाशिवनगर : चालू गाळप हंगाम २०२५–२०२६ मध्ये श्री. शंकर सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा ऐतिहासिक व दिलासादायक निर्णय घेतला आहे. कारखान्याच्या इतिहासात प्रथमच ऊसाला प्रथम हप्ता प्रतिमेट्रिक टन ३०२५ रुपये देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतल्याने ऊस उत्पादक सभासद व शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दि. १५ नोव्हेंबर २०२५ अखेर गाळपास आलेल्या ऊसासाठी प्रथम हप्ता प्रतिटन २९०० रुपयांप्रमाणे ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले असून, त्यानंतर शेतकरी संघटनांच्या आंदोलनाची दखल घेत तसेच इतर कारखान्यांच्या बरोबरीने शेतकऱ्यांना योग्य दर देण्याच्या धोरणातून, यापुढे गाळपास येणाऱ्या तसेच गाळपासाठी आलेल्या ऊसासाठी प्रथम हप्ता ३०२५ रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या ऐतिहासिक निर्णयाबद्दल सर्व ऊस उत्पादक सभासद व ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वतीने, कारखान्याचे चेअरमन तथा आमदार रणजितसिंह विजयसिंह मोहिते पाटील, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक तसेच अर्जुनसिंह मदनसिंह मोहिते पाटील यांचे मनःपूर्वक आभार व धन्यवाद व्यक्त करण्यात आले आहेत.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेला हा निर्णय सहकार क्षेत्रात आदर्श ठरणारा असून, कारखाना व शेतकरी यांच्यातील विश्वास अधिक दृढ करणारा आहे. या निर्णयामुळे गाळप हंगाम अधिक सुरळीत व यशस्वी होण्यास मदत होणार असल्याचे मत शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!