युवा लावणी सम्रागिनी राज्य सांस्कृतिक पुरस्काराने गौरव – प्रमिला सूर्यवंशी लोदगेकर यांचा लावणीच्या विश्वात उज्ज्वल सन्मान

महर्षि डिजीटल न्यूज/सागर खरात
अकलूज : रवींद्रनाट्य मंदिर येथे ३ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या राज्यस्तरीय सांस्कृतिक पुरस्कार वितरण सोहळ्यात लावणी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी प्रमिला सूर्यवंशी लोदगेकर यांना “युवा लावणी सम्रागिनी राज्य सांस्कृतिक पुरस्कार – २०२४” प्रदान करण्यात आला.
हा मानाचा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार आणि सांस्कृतिक विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
लावणी-संगीतबारीच्या परंपरेला आधुनिक अभिव्यक्ती देत, शास्त्रीयता आणि नृत्यभाव एकत्रितपणे जपणाऱ्या प्रमिला लोदगेकर यांनी अल्पावधीतच राज्यभरात स्वतःची स्वतंत्र छाप निर्माण केली आहे. त्यांच्या नेत्रदीपक सादरीकरणांनी, अभ्यासू शैलीने आणि संस्कृतिक वारसा जपण्याच्या निष्ठेने परीक्षकांना प्रभावित केले.
पुरस्कार स्वीकारताना त्या म्हणाल्या की, “हा सन्मान लावणी कलाप्रकाराला समर्पित आहे. गुरूजनांचे आशिर्वाद, प्रेक्षकांचे प्रेम आणि कलेप्रति असलेली निष्ठा या सर्वांचे हे फलित आहे.”
या पुरस्कारामुळे लावणी क्षेत्रातील तरुण कलाकारांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले असून, आगामी काळात प्रमिला सूर्यवंशी लोदगेकर यांच्याकडून आणखी भव्य कलात्मक कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे.



