सुमित्रा पतसंस्था फसवणूक प्रकरणात आरोपीस दोन महिने कैद व पाच लाखाचा दंड ; माळशिरस न्यायालयाचा धडक निर्णय

महर्षि डिजीटल न्यूज/ सागर खरात
अकलूज : सुमित्रा पतसंस्थेची कर्जफसवणूक करणाऱ्या आरोपीविरुद्ध माळशिरस न्यायालयाने कडक पवित्रा घेत महत्त्वपूर्ण निर्णय दिला. दि. ८ डिसेंबर रोजी न्यायाधीश व्यास साहेब यांनी दिलेल्या निकालात कर्जदार शिवराम नामदेव पिसाळ (रा. श्रीपूर) यास २ महिने साधी कैद व ₹५ लाखांचा दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली.
सुमित्रा पतसंस्थेकडून ४ लाख रुपये कर्ज घेतल्यानंतर फसवणूक करण्याच्या उद्देशाने आरोपीने संस्थेला चेक दिला. मात्र तो चेक वटला नाही आणि आरोपीकडून कोणतीही रक्कम परतफेडीस आली नाही. या प्रकारामुळे संस्थेची दिशाभूल झाली असल्याने संस्थेने ॲड. नितीन खराडे यांच्या मार्फत न्यायालयात दावा दाखल केला होता.
सुनावणीदरम्यान संस्थेने सादर केलेल्या पुराव्यांवरून आरोपीने कर्जफेड टाळल्याचे, तसेच जाणीवपूर्वक खोटी हमी देऊन आर्थिक फसवणूक केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. फसवणूक गंभीर असून पतसंस्थांचा विश्वास व आर्थिक शिस्त बिघडवणारा हा प्रकार असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने हा कठोर निर्णय दिला.
या निर्णयामुळे परिसरातील पतसंस्था व कर्जव्यवहारांबाबत सकारात्मक संदेश जाईल आणि अशा प्रकारच्या फसवणुकीला आळा बसेल, अशी प्रतिक्रिया स्थानिक पातळीवर व्यक्त होत आहे.



