मुले पळवणारी गँग तालुक्यात ? शाळेजवळ संशयास्पद हालचालींचा दावा ; वायरल मेसेज मळे भीतीचे वातावरण

महर्षि डिजीटल न्यूज/सागर खरात
अकलूज : माळशिरस तालुक्यातील एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात लहान विद्यार्थ्यांशी अनोळखी व्यक्तींनी संपर्क साधल्याचा दावा करणारा मेसेज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या मेसेजमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, मात्र या घटनेबाबत अधिकृत पातळीवर अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
व्हायरल मेसेजमध्ये दिलेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास शाळा सुरू होण्यापूर्वी काही लहान विद्यार्थी शाळेच्या परिसरात खेळत असताना दोन अनोळखी दुचाकीस्वारांनी त्यांच्याशी संवाद साधत चॉकलेट देण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांनी चॉकलेट घेण्यास नकार दिल्यानंतर त्यांना धमकावण्यात आल्याचा गंभीर आरोप या मेसेजमध्ये करण्यात आला आहे.
तसेच, संबंधित इसमांनी पुढील रस्त्यावर थांबून पुन्हा प्रयत्न केल्याचा आणि नंतर ते पळून गेल्याचा उल्लेख आहे. मेसेजमध्ये चॉकलेटमध्ये गुंगी येणारे किंवा बेशुद्ध करणारे औषध असल्याचा दावा देखील करण्यात आला असून, हा आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. मात्र, या दाव्यांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
दरम्यान, शाळेत शिक्षक आल्यानंतर विद्यार्थ्यांनी हा प्रकार शिक्षक व पालकांच्या निदर्शनास आणून दिल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर पालक व नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आणि परिसरात सतर्कता वाढवण्यात आली.
या संपूर्ण प्रकाराबाबत खरी वस्तुस्थिती काय आहे, हे स्पष्ट होणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावर फिरणाऱ्या अप्रमाणित संदेशांवर थेट विश्वास न ठेवता संयम बाळगावा, असे आवाहन सुज्ञ नागरिकांकडून करण्यात येत आहे.
तथापि, लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता, शाळा परिसरात किंवा सार्वजनिक ठिकाणी संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ संबंधित यंत्रणांना कळवणे आणि पालकांनी आपल्या मुलांवर विशेष लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.



