महिना १० टक्के परताव्याच्या आमिषाने कोट्यवधींची फसवणूक ; अकलुज पोलिसांकडून मोठा गुंतवणूक घोटाळा उघड

महर्षि डिजीटल न्यूज/सागर खरात
अकलूज : अकलुज (ता. माळशिरस) परिसरात तसेच सोलापूर, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांना भुरळ घालून महिना १० टक्के परताव्याचे आमिष दाखवत मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अकलुज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुंतवणूकदारांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
अकलुज येथील एका महिला फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार नवनाथ जगन्नाथ अवताडे, शुभम नवनाथ अवताडे, सुवर्णा नवनाथ अवताडे (मूळ रा. फळवणी, ता. माळशिरस, सध्या बिबवेवाडी, पुणे) तसेच अशोक आगतराव पवार, उमा अशोक पवार व आदेश अशोक पवार (रा. उघडेवाडी, ता. माळशिरस) यांनी इन्फिनिटी बीकॉन फायनान्शिअल सर्विसेस, आय बी प्रो डेस्क आणि MASTERSYNERGY EDUTECH LLP या कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवणुकीवर दरमहा १० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले.
या आमिषाला बळी पडून फिर्यादीकडून २४ लाख ५० हजार रुपये तर इतर १४ गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम स्वीकारण्यात आली. मात्र, कोणताही परतावा न देता तसेच मूळ गुंतवणूक रक्कमही परत न करता संबंधित आरोपींनी गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी अकलुज पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ८१५/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३५१(२), ३(५) तसेच महाराष्ट्र ठेवीदारांचे (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ चे कलम ३ व ४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान आरोपींनी विविध जिल्ह्यातील अनेक नागरिकांकडून गुंतवणूक स्वीकारल्याचे निष्पन्न होत असून, या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, वरील कंपन्या किंवा अशा स्वरूपाच्या कोणत्याही कंपनीत गुंतवणूक करून फसवणूक झालेली असल्यास संबंधित गुंतवणूकदारांनी तात्काळ गुंतवणुकीची कागदपत्रे घेऊन अकलुज पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.
या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निरज उबाळे, सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे तसेच पोहेकों अमोल बकाल व समीर पठाण करीत आहेत.



