वेळापूरचे पोलीस उपनिरीक्षक भाजपाच्या दावणीला? “मुख्यमंत्री देवाभाऊ” स्टेटस चर्चेत

महर्षि डिजीटल न्यूज / सागर खरात
अकलूज : वेळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक यांनी भाऊसाहेब गोसावी यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करणारे स्टेटस ठेवल्याने मोठा राजकीय वाद उफाळला आहे. पोलीस अधिकाऱ्याने राजकीय हेतूने स्टेटस ठेवले आहे का, यावरून चर्चा रंगली आहे.
सदर पोलीस उपनिरीक्षक यांनी फडणवीस यांच्या एका फोटोसह, “मुख्यमंत्री देवा भाऊ” असे संदेशासहित स्टेटस ठेवले. हा संदेश सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
पोलीस विभागाची भूमिका : पोलीस यंत्रणेतील अधिकाऱ्यांना राजकीय तटस्थता पाळणे बंधनकारक असते. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होणार असल्याचे ऐकायला मिळत आहे. संबंधित अधिकाऱ्याचे स्टेटस वैयक्तिक होता की यामागे कोणतीही राजकीय प्रेरणा होती, याची चौकशी होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे.
सामाजिक माध्यमांवरील प्रतिक्रिया : सामाजिक माध्यमांवर या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. अनेकांनी पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
वेळापूरचे पोलीस उपनिरीक्षक यांनी स्टेटस ठेवल्याने निर्माण झालेली चर्चा पोलिसांच्या राजकीय तटस्थतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते. या प्रकरणाचा तपास आणि पुढील कारवाई काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



