अनैतिक संबंधातून महिलेला ठार मारणाऱ्या आरोपीस जन्मठेप ; वाफेगाव येथील प्रकरणाचा निकाल

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : वाफेगाव (ता. माळशिरस) येथील मोहन बनसोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी शंकर दिगंबर सरवदे (रा. वाफेगाव) याच्याविरुद्ध अकलूज पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५४४/२०२२ भा.दं.वि. ३०२, २०१, ३७६, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फिर्यादी यांच्या पत्नीचे आरोपीसोबत अनैतिक संबंध होते. याबाबत फिर्यादी व साक्षीदारांनी दोघांना समज दिल्यानंतर पीडितेने आरोपीशी असलेले संबंध तोडून टाकले होते. काही दिवसांनंतर आरोपीने पीडितेला जोगळेकर यांच्या शेतात नेले. तेथे तिच्यासोबत संबंध ठेवून साडीने गळा आवळून तिचा खून केला.
या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक वैभव मारकड व सुनील जाधव यांनी पूर्ण करून आरोपीविरुद्ध न्यायालयात चार्जशीट दाखल केली होती. न्यायालयीन सुनावणीदरम्यान फिर्यादी, साक्षीदार, तपासी अधिकारी आणि डॉक्टर यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. सरकारी पक्षाकडून एकूण १५ साक्षीदार तपासण्यात आले.
सादर पुराव्यांच्या आधारे जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. हुली सोो यांनी आरोपी शंकर सरवदे यास दोषी ठरवत भा.दं.वि. ३०२ अंतर्गत जन्मठेप व २,००० रुपये दंड (न भरल्यास २ महिने साधा कारावास) आणि भा.दं.वि. २०१ अनुसार ३ वर्षे सश्रम कारावास व १,००० रुपये दंड (न भरल्यास १ महिना साधी कैद) अशी शिक्षा सुनावली.
या संपूर्ण प्रकरणात उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके, पोलीस निरीक्षक निरज उबाळे यांनी मार्गदर्शन केले. सरकारी वकील संग्राम एस. पाटील यांनी पक्ष मांडला तर कोर्ट पैरवी अधिकारी पोसई विजय जाधव, पोलीस हवालदार मुबारक तांबोळी व हरीष भोसले यांनी काम पाहिले.



