चैत्यभूमी कडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांसाठी विशेष रेल्वेगाडी सोडण्याची खा.धैर्यशील मोहिते पाटील यांची मागणी
महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ०६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी हजारो भिमसैनिक चैत्यभूमी येथे बाबासाहेबांच्या पवित्र स्मृतीस वंदन करण्यासाठी जातात. भारतीय रेल्वे विभागाच्या वतीने दरवर्षी सोलापूरहून विशेष अनारक्षित गाडया चालवल्या जातात.
महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने चैत्यभूमीकडे जाणाऱ्या अनुयायांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे यंदाच्या वर्षी आणखी विशेष अनारक्षित गाडी सायंकाळच्या सत्रात चालविण्याची व्यवस्था करण्यात यावी यासाठी सोलापूर रेल्वे व्यवस्थापक यांच्याकडे खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी विनंती केली आहे.
यामध्ये दिनांक ०४ डिसेंबर व ०५ डिसेंबर रोजी कलबुर्गी-सोलापूर-मुंबई ही गाडी तसेच ०६ डिसेंबर व ०७ डिसेंबर रोजी मुंबई-सोलापूर-कलबुर्गी या गाडी चा समावेश असून यामध्ये वयोवृद्ध लोक लहान मुले व महिला यांच्यासाठी स्लीपर कोच डबे जोडावे तसेच या विशेष गाड्यांना सोलापूर जिल्ह्यातील विविध लहान मोठ्या स्थानकांवर थांबा देण्यात यावा अशी मागणी ही खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले आहे.