माळशिरस तहसिल कार्यालयातील रेकॉर्ड रूम वर खाजगी व्यक्तीचा ताबा ;महत्वपूर्ण कागदपत्रांची देवाण घेवाण करत तांबडे यांनी लाटला लाखोंचा मलिदा
महर्षि डिजीटल न्यूज
माळशिरस : माळशिरस तहसिल कार्यालयातील रेकॉर्ड रूमवर खाजगी व्यक्तीच्या ताब्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात महत्वाच्या सरकारी कागदपत्रांची देवाणघेवाण होत असल्याची आणि लाखोंचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा संशय व्यक्त होत आहे.
महर्षि डिजीटल न्यूजला मिलालेल्या माहितीनुसार, तहसिल कार्यालयातील रेकॉर्ड रूम ही अत्यंत गोपनीय विभाग असून तेथे सरकारी जमिनीचे उतारे, नोंदी, ताबा हस्तांतरणाचे कागदपत्र, वादग्रस्त प्रकरणांची फाईल्स यांसारखी महत्वाची कागदपत्रे ठेवली जातात. मात्र, या रूमचे व्यवस्थापन सागर आण्णा तांबडे नामक एका खाजगी व्यक्तीकडे सोपविण्यात आले असून तो बेकायदेशीरपणे कागदपत्रांची देवाणघेवाण करत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणात जमीन खरेदी-विक्री, वादग्रस्त जमिनींचे हस्तांतरण, तसेच शेतजमिनींच्या बनावट उतार्यांद्वारे मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार केल्याचा संशय आहे. अनेक स्थानिक नागरिकांनी याबाबत तक्रारी केल्या असून, त्यांच्या म्हणण्यानुसार काही कागदपत्रे ’हवे तशी’ मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे उकळले जात आहेत.
याबाबत तहसिल कार्यालयातील रेकॉर्ड किपर संदीप कोळेकर यांची भूमिका देखील संशयाच्या भोवर्यात सापडली आहे. इतक्या महत्वाच्या विभागाचा खाजगी व्यक्तीकडे ताबा कसा सोपविला गेला, यावर अद्याप कोणतेही स्पष्टीकरण मिळालेले नाही. स्थानिक स्तरावर यामुळे संताप व्यक्त होत असून प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या प्रकाराची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. महसूल विभागाने यात हस्तक्षेप करून रेकॉर्ड रूममधील गोपनीय कागदपत्रांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.