आधुनिक तंत्रज्ञानामुळे पेट्रोल डिझेल मधील चोरी अशक्य – आ.रणजितसिंह मोहिते पाटील ; पेट्रोल पंपाचे 35 लाखाचे उत्पन्न असताना 50 लाखांच्या घोटाळ्याचा आरोप बिनबुडाचा – सभापती मदनसिंह मोहिते पाटील यांचे स्पष्टीकरण
महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे गाड्यांना सेंसर जीपीएस सिस्टीम बसविण्यात आल्यामुळे पेट्रोल डिझेलमध्ये चोरी किंवा त्यामध्ये घोटाळा करणे अशक्य असताना विरोधकांचे आरोप हास्यास्पद असल्याचे मत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केले तर मार्केट कमिटीच्या पेट्रोल पंपाचे 35 लाखाचे उत्पन्न असताना 50 लाखांच्या घोटाळ्याचा आरोप बिनबुडाचा असल्याचे स्पष्टीकरण सभापती मदनसिंह मोहिते पाटील दिले.
शंकरराव मोहिते पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूजच्या माळशिरस येथील पेट्रोल पंपाचे उद्घाटन दसऱ्याच्या मुहूर्तावर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते आज संपन्न झाले यावेळी दोघेही बोलत होते. या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, शंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मिलिंद कुलकर्णी, माज उपसभापती गणपतराव वाघमोडे, उपसभापती मामासाहेब पांढरे, माळशिरस नगरपरिषदेचे नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख, नातेपुते नगरपंचायतच्या नगराध्यक्ष अनिता लांडगे, संजय कोरटकर, चंदुकाका शिंदे, सचिव राजेंद्र काकडे यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक विविध संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.रणजितसिंह मोहिते पाटील म्हणाले, देशात 84 टक्के पेट्रोल डिझेल आयात केले जाते हे कमी करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने इथेनॉलचा वापर वाढवण्यावर भर देण्याचे प्रयत्न चालू आहेत याबरोबरच इलेक्ट्रिक वाहने व सीएनजी वाहने यांचे प्रमाण वाढत असल्याने भविष्यात सीएनजी पंप व इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंट सुरू करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
सभापती मदनसिंह मोहिते पाटील म्हणाले अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे वार्षिक उत्पन्न तीन कोटी असून वरचेवर उत्पन्नात वाढ होत आहे. गेल्या दोन वर्षात अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचा सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक तर राज्यात बारावा क्रमांक आला आहे. पारदर्शक कारभारामुळे शेतकऱ्यांचा बाजार समितीवर विश्वास वाढत असताना विरोधक बिनबुडाचे व निरर्थक आरोप करून बेहिशेबी, चुकीचे आकडेवारी सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.
स्वागत मारुती रूपनवर यांनी तर सूत्रसंचालन धनंजय देशमुख यांनी केले.