स्मशानात राहणार्या कुटुंबाला अकलूज नगरपरिषदेचा आधार, ‘महर्षि’ च्या वृत्ताची दखल ; मुलांना शालेय साहित्याचे वाटप

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : महर्षिच्या डिजीटल न्यूज ने आपल्या यु टट्यूब चॅनेलच्या माध्यमातून केलेल्या विशेष रिपोर्टची दखल घेत अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी स्मशानात जिवन जगणार्या कुटुंबासाठी मदतीचा हात पुढे केला असून दुर्लक्षित राहिलेल्या आपल्या कुटुंबाला कोणीतरी न्याय देतंय या भावनेने अख्ख्या कुटुंबाला मात्र गहिवरून आले व आम्ही खूप शाळा शिकणार… मोठे होणार असे विश्वास दाखवत आनंद आणि दु:खाचा संगम झालेले चेहरे घेऊन चिमुरडे मात्र स्तब्ध झाले होते.

एकीकडे आपला देश चंद्रावर यशस्वीरित्या पाऊल ठेऊन नवनवीन शोध लावत असताना देशातील विशेष करून महाराष्ट्रातील पिढ्यानपिढ्या स्मशानात आपले जिवन व्यथीत करणार्या ‘मसानजोगी’ समाजाकडे व त्यांच्या व्यथांकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याबाबत ‘महर्षि डिजीटल न्यूज’ ने यु ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून ‘भाकरीच्या शोधातील स्मशानातील जिवन’ या मथळ्याखाली विशेष स्टोरी प्रसारीत केली होती. यामध्ये संपादक सागर खरात व पत्रकार डि.एस.गायकवाड यांनी थेट अकलूज येथील वैकुठ स्मशानात जाऊन स्मशानात जिवन जगणार्या जाधव कुटुंबाची मुलाखत घेतली.
‘महर्षि डिजीटल न्यूज’ ने सदरची बातमी प्रसारीत केल्यानंतर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त करत ‘त्या’ कुटुंबाबत संवेदना व्यक्त केल्या तर अनेकांनी ‘महर्षि’ ने केलेल्या विशेष स्टोरीचे कौतुक करत दुर्लक्षित समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आभार व्यक्त केले. हि स्टोरी पाहून अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांचेही मन हेलावून गेले. त्यांनी तात्काळ त्यांचे स्विय सहाय्यक रोहित शेटे व महिला व बालकल्याण विभागाच्या नाजनीन शेख यांना संबंधित कुटुंबाची भेट घेण्याचे आदेश दिले व नगरपरिषदेमार्फत त्यांना काय मदत करता येईल याचा अहवाल तयार करण्यास सांगितला.
त्याप्रमाणे आज नगरपरिषद कार्यालयात स्मशानात जिवन जगणार्या जाधव यांच्या कुटुंबाला बोलावून त्यांच्या तिन मुले व एक मुलगी या चौघांनाही शालेय गणवेश, प्रत्येकी दोन डझन वही, दप्तर, बूट व इतर शालेय साहित्य देण्यात आले. शिवाय स्वयंपाकासाठी शेगडी देण्यात आली. याबरोबरच जाधव यांच्या पत्नीला शिवणक्लास लावून त्यांना शिलाई मशिन देण्याचे व जाधव यांना नगरपरिषदेमार्फत नोकरी देण्याचे आश्वासन यावेळी दयानंद गोरे यांनी दिले. तसेच त्यांच्या निवार्यासाठी लवकरच पत्र्याचे शेड व पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र टाकी उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
बातमीची विश्वासार्हता आणि दखल घेण्याजोगी बातमी हेच प्रमुख वैशिष्ठ्य असलेले ‘साप्ताहिक महर्षि’ व ‘महर्षि डिजीटल न्यूज’ सर्वसामान्यांचा आवाज असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. सकारात्मक बातम्या व न्याय मिळवून देण्याची धमक असलेल्या ‘महर्षि’चे यावेळी जाधव कुटुंबीय व मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी विशेष आभार मानले.
यावेळी उपमुख्याधिकारी जयसिंह खुळे, कर निरीक्षक बाळासाहेब वाईकर, मालमत्ता व्यवस्थापनचे सुनिल काशिद, महिला बालकल्याणच्या नाजनीन शेख, रोहित शेटे, सागर बनसोडे, आकाश ठोंबरे, विजय कांबळे, नरेंद्र पाटोळे, तेजस कसबे उपस्थित होते.