विशेष

श्रीपूर महाळुंगच्या नगराध्यक्षपदावर टांगती तलवार ; सदस्यत्व अपात्र ठरवण्याची मागणी

महर्षि डिजीटल न्यूज

अकलूज : महाळुंग -श्रीपुर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष लक्ष्मी अशोक चव्हाण यांचे राहते घर व वापरात असणारे शौचालय हे नगरपंचायत गावठाण हद्दीत आहे . त्यामुळे महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम १९६५ चे कलम ४४ ( १ ) ई प्रमाणे त्यांचे सदस्यत्व अपात्र ठरवावे अशी मागणी लक्ष्मी चव्हाण यांच्या प्रभागातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे .त्यामुळे महाळुंग – श्रीपुरमधील राजकारण चांगलेच तापले आहे .

याबाबत माहिती अशी की , नगराध्यक्ष लक्ष्मी चव्हाण नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक पाच मधून नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या आहेत . या प्रभागातील मतदार मल्हारी पोपट जाधव ,सोमनाथ महादेव माने ,नागनाथ जालिंदर शिंदे ,आबा भीमा जाधव यांनी सोलापूर येथे जिल्हाधिकारी यांच्याकडे लक्ष्मी चव्हाण यांना अपात्र करण्यासंदर्भातील तक्रार अर्ज तुळजापूर येथील अॅड दत्तात्रय घोडके यांच्यामार्फत दाखल केला आहे .आम्ही प्रभाग क्रमांक पाच मधील मतदार असल्याने कायद्याने आम्हाला हा अर्ज दाखल करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे तक्रारदारांनी नमूद केले आहे . 

महाळुंग – श्रीपूर  नगरपंचायतीची पहिली सार्वत्रिक निवडणूक २०२१ मध्ये झाली होती . त्यावेळी लक्ष्मी अशोक चव्हाण या प्रभाग पाच मधून नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या . नंतर त्या नगराध्यक्ष बनल्या . त्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी शौचालयाचे जे प्रमाणपत्र दिलेले आहे त्या प्रमाणपत्राचा विचार करता सदर शौचालय हे नगरपरिषद मिळकत क्रमांक ४६७/ ८ आठ मध्ये अस्तित्वात आहे . ही मिळकत नगरपंचायतीची असून लक्ष्मी चव्हाण यांचा त्यावर ताबा आहे .त्या संबंधित मालमत्तेच्या मालक नाहीत .

महाळुंग -श्रीपुर नगरपंचायत नमुना नंबर ८ नियम ३२ (१ ) अन्वये अस्तित्वात असलेले गावठाण रजिस्टर २ चा उतारा लक्षात घेता अनुक्रमांक ७५८ वरती महाळुंग गावठाण या भागांमध्ये मालमत्ता क्रमांक ४६७/ ८ ही मालमत्ता येते . म्हणजे सदरची मालमत्ता ही गावठाण हद्दीत येते .सदर मिळकतीच्या मालक नावाच्या समोर महाळुंग ग्रामपंचायत महाळुंग – श्रीपुर अशी नोंद त्या ठिकाणी दिसून येते . भोगवटादार या कॉलम मध्ये अशोक पांडुरंग चव्हाण व लक्ष्मी चव्हाण यांची नावे दिसून येतात .हे बांधकाम महाराष्ट्र नगर रचना अधिनियमाचे उल्लंघन करून झाले असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे . महाराष्ट्र नगर परिषद अधिनियमानुसार कलम ४४ ( १ ) ई अन्वये कोणत्याही सदस्यांनी किंवा त्यांच्या वैवाहिक जोडीदाराने या अधिनियमाच्या तरतुदीचा उल्लंघन केला तर संबंधित व्यक्ती सदस्य म्हणून पात्र राहू शकत नाही . 

त्याशिवाय हे बांधकाम करताना नगरपंचायतीची परवानगीही घेतली नसल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे .त्यामुळे नगराध्यक्ष लक्ष्मी अशोक चव्हाण यांचे नगरसेवक पद अपात्र ठरवण्याची मागणी त्यांच्याच प्रभागातील मतदारांनी केली आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!