Latest News

मळोली गावचा मोडी प्रशिक्षण वर्गात डंका ; समरसिंग शिंदे प्रथम, मदनसिंह जाधव व अक्षयकुमार भगत यांचेही घवघवीत यश

महर्षि डिजीटल न्यूज 

अकलूज : महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख संचालनालयाच्या वतीने सोलापूर येथील व्ही.जे. शिवदारे कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स अँड सायन्समध्ये नुकतीच मोडी लिपी प्रशिक्षण परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, मळोली गावच्या मोडी प्रशिक्षण वर्गात अक्षरशः डंका वाजला आहे. या परीक्षेत मळोली गावचे सुपुत्र समरसिंग मानसिंग शिंदे यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून, मदनसिंह अमरसिंह जाधव आणि अक्षयकुमार रामचंद्र भगत यांनीही उच्च गुणांसह उल्लेखनीय यश मिळवले आहे.

या तिघांच्या यशामुळे मळोली गावाचे नाव जिल्हाभर गाजत असून, गावात सर्वत्र अभिमान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मोडी लिपी ही मराठी संस्कृतीचा आत्मा मानली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात राज्यकारभाराची अधिकृत लिपी म्हणून तिचा वापर होत असे. हजारो ऐतिहासिक दस्तऐवज, वंशवृक्ष, जमीन नोंदी आणि सरकारी कागदपत्रे आजही या लिपीत उपलब्ध आहेत. त्यामुळे मोडी लिपी शिकणे व तिचा प्रसार करणे हे आजच्या पिढीपुढील एक ऐतिहासिक कर्तव्य ठरते. हेच कार्य पार पाडणारे मळोली गावचे हे तीन विद्यार्थी आज संपूर्ण जिल्ह्यात आदर्श ठरत आहेत.

मोडी प्रशिक्षण वर्गाचे प्रशिक्षक गवळी सर म्हणाले, “विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि जिद्दीने अभ्यास केला. समरसिंग शिंदे यांचा अभ्यासाचा दृष्टिकोन आणि समर्पण सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.”
तर दुसरे प्रशिक्षक फुलकरी सर यांनी सांगितले, “या तिघांनी मोडी लिपीचा आत्मा समजून घेतला आहे. त्यांनी ही लिपी केवळ शिकली नाही, तर तिच्या संवर्धनाची जबाबदारीही स्विकारली आहे.”

या प्रशिक्षण शिबिराच्या यशामागे शिवदारे कॉलेजचे प्राचार्य सूत्रांवे सर यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मोलाचे ठरले. सूत्रांवे सर म्हणाले, “मोडी लिपी ही आपल्या इतिहासाशी जोडणारा सजीव दुवा आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे कॉलेजचं नाव अधिक उंचावलं आहे.”
तसेच बावजे मॅडम यांनी प्रशिक्षण वर्गाचे नियोजन, विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन आणि परीक्षा प्रक्रिया काटेकोरपणे पार पाडत शिबिर यशस्वी केले.

या तिन्ही विद्यार्थ्यांच्या यशामुळे मळोली गावात आनंदाचे वातावरण आहे. ग्रामस्थ, शिक्षकवर्ग आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार करून अभिनंदनाचा वर्षाव केला. गावकऱ्यांनी या तिकडीकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. ग्रामस्थ म्हणतात, “गावातील अनेक जुनी दफ्तरे, जमीन नोंदी आणि पत्रे आजही मोडी लिपीत आहेत. आता ही तिकडी ती वाचून दाखवू शकेल, त्याचा अर्थ समजावून सांगू शकेल. त्यांनी मोडी लिपी वाचन केंद्र सुरू करून गावातील तरुणांना या लिपीचे प्रशिक्षण द्यावे, अशी आमची अपेक्षा आहे.”

समरसिंग शिंदे, मदनसिंह जाधव आणि अक्षयकुमार भगत या तिघांनीही गावकऱ्यांच्या अपेक्षांचा सन्मान ठेवत पुढे मोडी लिपी वाचन, लेखन आणि भाषांतर या क्षेत्रात कार्य सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, “गावकऱ्यांच्या जुन्या दस्तऐवजांचे अर्थ समजावून देणे आणि मोडी लिपीची ओळख प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे हे आमचे पुढील ध्येय आहे.”

मळोली गावातून उमटलेला हा मोडीचा डंका आता सोलापूर जिल्हाभर झंकारत आहे. इतिहास आणि परंपरा जपण्याचे कार्य या तरुण तिकडीने हाती घेतल्याने मळोली गाव मोडी शिक्षणाचे नवे प्रेरणास्थान बनत आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा वारसा अधिक दृढ होईल, अशी खात्री ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या तिघांच्या यशामुळे मळोली गावाचा मान केवळ जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण राज्यभर उंचावला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!