विरोधकांच्या गोंधळाला सत्ताधारी मोहिते-पाटील समर्थकांचे चोख प्रत्युत्तर ; सोशल मिडीयात केलेल्या आवाहनाला प्रतिसाद न मिळाल्याने विरोधक बावचळले-उपसभापती मामासाहेब पांढरे
महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : काही ठराविक मिडीया तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून अकलूज कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित राहण्यासाठी विरोधकांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद न मिळाल्याने ते बावचाळले असून त्यामुळे त्यांनी सभेमध्ये गोंधळ घालून सभा हाणून पाडण्याचा प्रयत्न केला असल्याची जहरी टिका उपसभापती मामासाहेब पांढरे यांनी केली आहे.
सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या अकलूज कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अपेक्षेप्रमाणे आज गोंधळ होऊन सभा उधळून लावण्याच्या विरोधकांच्या मनसुब्यांना सत्ताधारी संचालक व समर्थकांनी केराची टोपली दाखवली. गोंधळाच्या वातावरणातही सर्व विषयांचे वाचन होऊन त्यास एकमुखाने मंजुरी देत सत्ताधारी मोहिते-पाटील गटाने विरोधी गटाला चोख प्रत्युत्तर देत त्यांना सभा उधळवून लावण्यापासून रोखले व सभेचे कामकाज पूर्ण केले.
सभेतील गोंधळाबाबत बोलताना उपसभापती मामासाहेब पांढरे म्हणाले, सभेचे कामकाज व्यवस्थित चालू असताना विरोधकांनी मध्येच उठून भाषणबाजी चालू केली. त्यांना एखाद्या मुद्यावर आक्षेप असेल त्याच मुद्यावर बोलणे अपेक्षीत होते परंतु राजकीय स्टंटबाजी करून सभेचे विषय वेगळे व बोलणे वेगळे असल्याचे लक्षात येताच आमच्या सत्ताधारी सभासदांनी त्यांना मुद्यावर बोलण्यास सांगितले. यावर विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली व सभा उधळवून लावण्याच्या मनसुब्याने सभेच्या कामकाजात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
मोहिते-पाटील समर्थकांची आक्रमकता एरवी शांत संयमी असलेले मोहिते-पाटील समर्थक आजच्या सभेत चांगलेच आक्रमक झालेले पहायला मिळाले. वार्षिक सभेदरम्यान विरोधकांकडून गोंधळ घालण्याचा प्रयत्न होत असल्याचे निदर्शनास येताच मोहिते-पाटील समर्थकही चांगलेच आक्रमक झाले. आजतागायत मोहिते-पाटील गटाने कधीही एवढी आक्रमकता दाखवली नव्हती परंतु ज्येष्ठ नेते व सभापती मदनसिंह मोहिते-पाटील यांच्या भोवती विरोधक गोंधळ घालण्याचा प्रयत्न करत असल्याचे लक्षात येताच प्रत्येकाला जशास तसे उत्तर देत विरोधकांची हवाच काढून घेतली.