Latest News

स्वतःच्या संस्था लुबाडून विकून खाणाऱ्यांनी मोहिते पाटलांच्या संस्थेबाबत बोलू नये – लक्ष्मण पवार

महर्षि डिजीटल न्यूज

अकलूज : स्वतःला उभ्या आयुष्यात कधी संस्था काढणे जमले नाही आणि काढलेल्या संस्था लुबाडून त्या विकून खाल्ल्या. अशा लुटारू विरोधकांनी मोहिते पाटलांच्या संस्था बाबत बोलू नाही त्यांना तसा नैतिक अधिकारही नाही अशी घाणाघाती टीका अकलूज कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण पवार यांनी केली.

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा उधळून लावण्याच्या इराद्याने चार टाळकी गोळा करून सभेत गोंधळ घालणाऱ्याने मोहिते पाटलांवर आरोप करताना “चोराच्या उलट्या बोंबा” मारल्या आहेत बिन बुडाचे आरोप व लक्ष वेधून घेण्याच्या उद्देशाने उत्तम जानकर यांनी स्टंटबाजी केली असल्याचेही लक्ष्मण पवार यांनी सांगितले. 

मोहिते पाटलांनी संस्था उभा केल्या व त्या यशस्वीरित्या चालवून दाखवल्या, शेतकऱ्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळवून दिली, लाखो बेरोजगारांच्या हाताला काम दिले, हजारो संसार फुलवले. परंतु “आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून” याप्रमाणे स्वतःच्या संस्था बुडवून आज दुसऱ्याच्या संस्थेत लुडबुड करायचं कारस्थान विरोधक करताना दिसत आहेत. त्यांना तसा नैतिक अधिकार तरी आहे का याचे त्यांनी स्वतःच आत्मपरीक्षण करावे असेही लक्ष्मण पवार यांनी म्हटले आहे.

बाजार समिती निवडणुकीच्या वेळेसही ज्या पॅनल मधून उत्तम जानकर यांनी निवडणूक लढवली त्या पॅनल मधील आपल्या सहकाऱ्यांनाही यांनी धोका दिला आहे. स्वतः पुरते मत मागून आपल्या पॅनललाच फसवणारे तालुक्यातील जनतेला किती फसवत असतील याचा अंदाज न लावलेलाच बरा. मोहिते पाटलांच्या संस्थेला अशा फसवेबाज नेत्याच्या दीड शहाणेपणाची आवश्यकता नसल्याचेही लक्ष्मण पवार यांनी सांगितले.

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीची वाटचाल अत्यंत योग्य मार्गाने व यशस्वीरित्या सुरू आहे. तालुक्यातीलच नव्हे तर आसपासच्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना व उत्पादनांना रेकॉर्ड ब्रेक भाव मिळत असल्याने अकलूज बाजार समितीकडे शेतकऱ्यांचा ओढा असल्याचे नेहमीच पाहायला मिळते. शेतकरी व्यापारी यांना योग्य सोयी सुविधा व योग्य भाव मिळत असल्याने अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती सातत्याने प्रगतीपथावर राहिली आहे.

जनावरांचा बाजार, डाळिंबाला मिळालेला उच्चांकी दर, घोडेबाजार यामुळे अकलूज बाजार समिती देशभर प्रसिद्ध झाली आहे. असे असतानाही केवळ विरोधाला विरोध करण्याच्या हेतूने उत्तम जानकर नाहक व बिन बुडाचे आरोप करत आहेत. त्यांच्या आरोपाला शेतकरी व तालुक्यातील जनतेने या अगोदरही उत्तर दिले आहे आणि यापुढेही उत्तर देईल यात शंका नाही असेही संचालक लक्ष्मण पवार यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!