गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या निर्मूलनासाठी ‘पिंक रेव्होल्युशन’कडून राष्ट्रीय आरोग्य अभियानात सहभागी होण्याची विनंती ; श्रद्धा जवंजाळ यांचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांना निवेदन

महर्षि डिजीटल न्यूज / सागर खरात
अकलूज : महिलांच्या आरोग्याचा गंभीर मुद्दा ठरलेल्या गर्भाशयाच्या मुखाच्या (सर्व्हिकल) कर्करोगाच्या निर्मूलनासाठी कार्यरत असलेली ‘पिंक रेव्होल्युशन’ ही नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था आता राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), महाराष्ट्र सोबत भागीदारीस इच्छुक आहे. संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष डॉ.श्रद्धा राहुल जवंजाळ यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना या संबंधी निवेदन दिले आहे.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव आज करमाळा दौऱ्यावर आले असताना डॉक्टर श्रद्धा जवंजाळ यांनी त्यांची भेट घेऊन निवेदन दिले यावेळी त्यांच्याबरोबर डॉक्टर राहुल जवंजाळ उपस्थित होते.
‘पिंक रेव्होल्युशन’ ही संस्था गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासंदर्भात जनजागृती, तपासणी, उपचार व महिला आरोग्य सेवांमध्ये सातत्याने कार्यरत आहे. “भारतामधून गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग संपवणे” हा संस्थेचा प्रमुख उद्देश असून, NHM महाराष्ट्रच्या आरोग्य सेवा उद्दिष्टांमध्ये आमचा सहभाग उपयुक्त ठरेल, असे डॉ.जवंजाळ यांनी पत्रात नमूद केले आहे.
NHM मध्ये सहभागासाठी संस्थेने पुढील चार बाबींमध्ये सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे:
1. कार्यक्रम राबविणे व पाठबळ देणे
2. आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण व क्षमता वृद्धी
3. जनजागृती व समुदाय सक्षमीकरण
4. आरोग्य सेवा मूल्यांकन व निरीक्षण
डॉ.जवंजाळ यांनी सांगितले की, “NHM, महाराष्ट्र यांच्याशी भागीदारी झाल्यास वंचित आणि दुर्लक्षित समुदायांपर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचवणे शक्य होईल, तसेच त्यांच्या आरोग्य परिणामांमध्ये सकारात्मक सुधारणा घडेल.”
शेवटी, त्यांनी यासंबंधी प्रस्तावित उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्याची तयारी दर्शवली असून, NHM च्या मार्गदर्शक सूचनांनुसार त्यांच्या संस्थेचा सहभाग घ्यावा, अशी नम्र विनंती केली आहे.



