कार्यकर्त्यांनी बूथ स्तरावर सक्षमपणे काम करावे – आ.रणजितसिंह मोहिते पाटील ; अकलूज येथे मोदी@9अंतर्गत लाभार्थी संमेलन उत्साहात
महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : मोदी@9अंतर्गत माळशिरस तालुका व माढा विधानसभा मतदारसंघातील माळशिरस तालुक्यातील येणारी गावे यांचे लाभार्थी संमेलन अकलूज येथे उत्साहात पार पडले याप्रसंगी आ. रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी विविध योजनांची माहिती देत कार्यकर्त्यांनी बूथ स्तरावर सक्षमपणे काम करावे असे आवाहन केले.

अकलूज येथील कृष्णप्रिया हॉलमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोदी@9अंतर्गत लाभार्थी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, राजकुमार पाटील, सहकार महर्षी कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रकाशराव पाटील,बाबाराजे देशमुख, ज्येष्ठ नेते गणपतराव वाघमोडे,रामचंद्र सावंत पाटील, रावसाहेब पराडे पाटील, ॲड. मिलिंद कुलकर्णी, कल्पना कुलकर्णी, प्रतापराव पाटील, बाळासाहेब सरगर, मामासाहेब पांढरे, दत्तात्रय भिलारे, संदीप घाडगे, सुरज मस्के आदी मान्यवरासह तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी सरपंच ,उपसरपंच,सदस्य उपस्थित होते.
याप्रसंगी प्रस्ताविक करताना भाजपाचे माळशिरस तालुकाध्यक्ष बाजीराव काटकर यांनी मोदी@9 ची परिपूर्ण माहिती सांगितली.मोदी सरकारने राबविलेल्या विविध योजना तळागाळात रुजत आहेत अनेक लाभार्थी याचा लाभ घेत आहेत म्हणूनच हे लाभार्थी संमेलन आयोजित केले असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. याप्रसंगी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत असंख्य कार्यकर्त्यांनी सरल ॲप डाऊनलोड करून भाजपाची सदस्य नोंदणी करून घेतली. याप्रसंगी आ.मोहिते पाटील यांनी तालुक्यात घेतलेल्या आढावा बैठकीतील प्रश्न मंत्रालय स्तरावर पुढच्या महिनाभरापर्यंत सुटतील असे सांगण्यात आले.
याशिवाय नवीन प्रश्न असतील तर ते लवकरात लवकर सांगावेत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या लाभार्थी संमेलनामध्ये आमदार मोहिते पाटील यांनी गेल्या नऊ वर्षात देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कार्याचा आढावा सांगितला. या बैठकीत भाजपा कार्यकर्त्यांच्या कार्याचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सुरू असलेले उपक्रम केंद्र आणि राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी राबवलेल्या विविध कार्यक्रमाबाबत यावेळी चर्चा झाली.



