अकलूजच्या बाजारात समितीत डाळींबाला सोन्याचा भाव ; शेतकऱ्यांमध्ये आनंदाची लाट

महर्षि डिजीटल न्यूज / सागर खरात
अकलूज : सहकार पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अकलूज बाजार समितीमध्ये डाळींबाला तब्बल ३०१ रुपये प्रति किलो असा उच्चांकी दर मिळाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. या उत्तम दरामुळे अकलूज बाजार समिती आता डाळींब पंढरी म्हणूनही नावारूपाला येत आहे.
सिध्दीविनायक फ्रुट कंपनीचे व्यापारी सागर नागणे यांच्या आडत दुकानी शेतकरी दत्तात्रय पाटील (रा. फोंडशिरस) यांच्या ‘भगवा’ जातीच्या डाळींबाला ३०१ रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला. याशिवाय, बालाजी फ्रुट कंपनीचे अमोल जाधव यांच्या आडतीवर युवराज मारकड (रा. मारकडवाडी) यांना, जयअंबे फ्रुट कंपनीचे मनोज जाधव यांच्या आडतीवर तुकाराम पावले यांना व मोहम्मद साद फ्रुट कंपनीचे राजूभाई बागवान यांच्या आडतीवर अंकुशराव केचे यांना देखील डाळींबासाठी ३०१ रुपये प्रति किलोचा दर मिळाला.
दरम्यान, शेतकरी गणेश लवटे (रा. फोंडशिरस) यांच्या डाळींबाला मागील आठवड्यापासून सातत्याने २५० रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे.
बाजार समितीच्या सौदेबाजारात आडते, खरेदीदार आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पूर्व सिझनमध्ये मिळालेल्या या उत्साहवर्धक दरामुळे आगामी हंगामासाठी शेतकऱ्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे.
अकलूज बाजार पेठ ही मध्यवर्ती असल्यामुळे इंदापूर, माढा, माण, खटाव, फलटण आदी तालुक्यांतील शेतकरीदेखील आपल्या डाळींबाची विक्री अकलूज येथे करत आहेत.
शेतमालाची योग्य प्रतवारी, मोजमाप, चोख वजन आणि रोख पट्टी या बाबतीत अकलूज बाजार समितीचा उच्च दर्जा टिकून आहे. सभापती मदनसिंह मोहिते पाटील व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीमध्ये करण्यात आलेल्या सूक्ष्म नियोजन व पायाभूत सुविधा यामुळे शेतकरी व व्यापारी वर्ग पूर्णपणे समाधानी आहेत.



