फुकटचे श्रेय घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या लोकप्रतिनिधींना नाकारून स्थानिक नागरिकांनी उरकले चांदज ते टणू पुलाचे भूमिपूजन

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : आयत्या पिठावर रेगोट्या मारून फुकटचे श्रेय घेण्याच्या प्रयत्नात असलेले माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार व आमदार यांचा नियोजित भूमिपूजनाचा कार्यक्रम डावलून स्थानिक नागरिकांनीच चांदज ते टणू पुलाचे भूमिपूजन उरकल्याने त्यांच्याविषयीचा रोज चव्हाट्यावर आला आहे.
माढा तालुक्यातील चांदज, व इंदापूर तालुक्यातील टणू या दोन गावांच्या मधून भिमा नदी वाहते, त्यामुळे माढा तालुक्यातील कोंढार भागातील आढेगांव, वडोली, रांझणी, टाकळी नागोर्ली तसेच इंदापूर तालुक्यातील नरसिंहपूर, टणू, पिंपरी बु., गिरवी या गावातील नागरिकांना जाणे येणेसाठी सुमारे १० किमी चा वळसा घालावा लागत होता. या गंभीर समस्येकडे स्थानिक आमदार बबनराव शिंदे यांनी दुर्लक्ष केल्यामुळे येथील नागरिकांनी आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्याकडे साकडे घातले होते.
त्यानुसार आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करून तात्काळ यासाठी २५ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून घेतला होता.
परंतु आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फुकटचे श्रेय घेण्याच्या उद्देशाने आज खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते व आमदार बबनराव शिंदे यांच्या उपस्थितीत शासकीय अधिकाऱ्यांना डावलून खाजगी कार्यक्रम घेत या पुलाचे भूमिपूजन करण्याचा घाट घातला होता. पण परिसरातील सजग नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्याचा हा घाट उधळून लावत सर्व नागरिकांनी एकत्रित येऊन सदरच्या लोकप्रतिनिधी विषयी रोष व्यक्त केला. व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते विधीवत पूजा करून नारळ वाढवत या या पुलाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आज सकाळीच उरकून टाकला आहे.
यावेळी ज्येष्ठ नागरिक रामचंद्र कृष्णा मचाले, सुभाष पंढरीनाथ मोहिते पाटील, बलभीम भिकाजी मोहिते पाटील, राजेंद्र भिकाजी मोहिते पाटील, मोहन सदाशिव मोहिते, सुदाम काजळे, सोमनाथ मोहिते, ह.भ.प पांडुरंग मोहिते, अमृत मोहिते, बलभीम मोहिते, रमेश काजळे, संताजी मोहिते, रणजीत मोहिते यांचेसह परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



