तब्बल सहा महिन्यांपासून कंत्राटी डॉक्टरांना पगारच नाही ; आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यातील 30 तर माळशिरस तालुक्यातील 09 डॉक्टरांचे पगार थकले
महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कंत्राटी वैद्यकीय अधिकार्यांना तब्बल मे महिन्यापासून पगार मिलालेला नाही. गेल्या सहा महिन्यापासून पगार रखडल्यामुळे जगायचे कसे? असा प्रश्न या वैद्यकीय अधिकार्यांसमोर निर्माण झाला आहे. आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने कंत्राटी वैद्यकीय अधिकार्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या अंतर्गत येणार्या सोलापूर जिल्ह्यातील 30 तर माळशिरस तालुक्यातील 09 प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कंत्राटी वैद्यकिय अधिकार्यांचे पगार गेल्या 6 महिन्यांपासून रखडल्यामुळे सदरच्या वैद्यकीय अधिकार्यांची दिवाळीसुध्दा अंधारातच गेली आहे. शिवाय त्यांच्य रोजी रोटीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सावकाराकडून व पाव्हणे रावळ्यांकडून उसनवार पैसे घेऊन ‘संसाराचा गाडा’ त्यांच्याकडून ढकलला जात आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रातील कंत्राटी वैद्यकीय अधिकार्यांनी कोरोनाच्या काळात कुटुंबाची व स्वत:च्या जिवाची परवा न करता जीवाची बाजी लावून काम केले. ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देत असताना सहा महिन्यांपासून वेतन नसल्याने या कंत्राटी वैद्यकीय अधिकार्यांना प्रपंच चालविणे कठीण झाले आहे. दिवाळी येवून गेली, परंतु अनेकांना दिवाळी साजरीच करता आली नाही. त्यामुळे या कंत्राटी वैद्यकीय अधिकार्यांचा रखडलेला सहा महिन्यांचा पगार देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग व प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधी यांनी काळजीपूर्वक दखल घेणे गरजेचे बनले आहे.