बंधार्याच्या भराव्याची झाली घसरगुंडी ; लुमेवाडी-माळीनगर बंधार्यावरून शालेय विद्यार्थ्यांचा जिवघेणा प्रवास, निकृष्ट कामामुळे नागरिक संतप्त
महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : लोकप्रतिनिधींनी कितीही निधी आणला तरी ठेकेदार आणि अधिकारी यांच्या संगनमताने होणार्या निकृष्ट कामामुळे सर्व निधीवर पाणी फेरले जाण्याचा प्रकार आता नित्याचाच झाला आहे. लाखो रूपये खर्चुनही नागरीकांना आपला जिव मुठीत घेऊनच जगावे लागणार असेल तर तो निधी काय कामाचा? असा सवालही नागरीक विचारताना दिसत आहेत. असा सवाल उपस्थित होण्याला अनेक कारणे असली तरी यावेळी निमित्त आहे लुमेवाडी-माळीनगर बंधार्याचे.
लुमेवाडी (ता.इंदापूर) येथून माळीनगर (ता.माळशिरस) दरम्यान नीरा नदीवरून जोडलेला कोल्हापुरी पद्धतीच्या बंधार्याच्या बाजूचा भराव चिखलमय झाला असून बंधार्यावरून मुख्य रस्त्याला जोडणार्या रस्ताच्या दरम्यान शिवारातील रस्त्याची काल झालेल्या पावसामुळे दुर्दशा झाली आहे. बंधार्याच्या भराव्याची अक्षरश: झाली घसरगुंडी झाली असल्याचे पहायाला मिळत असून अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या बंधार्यावरून शिक्षणासाठी शेतीकामासाठी शाळकरी विद्यार्थी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने ये-जा होत असते.
गेल्यावर्षी आलेल्या पूरामुळे या बंधार्यांच्या भराव वाहून गेला होता त्यावेळी विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पूर्व भागातील नीरा नदीवरील बंधार्यांची पाहणी करून दुरूस्ती विषयी सुचना संबंधितांना केल्या होत्या दरम्यान यावर्षी आलेल्या पहिल्या पावसामुळे बंधार्यांना जोडणार्या रस्ताची वाताहत पाहता वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शालेय मुल-मुली सायकल किंवा पायी, मोटारसायकल छोटी वाहने ये-जा करण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून प्रवास करत असतात मात्र रस्त्याची अवस्था पाहता अजून पावसाने जोर धरल्यास रस्त्याची परिस्थिती बिकट होऊ शकते.
यावर्षी पावसाने ओढ दिली मात्र आता सुरू झालेल्या पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही दरम्यान शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि नागरिकांच्या दळणवळणासाठी सदर बंधार्यांना जोडणारे रस्ते कायम स्वरुपी टिकाऊ आणि पाण्याच्या प्रवाहाने वाहून जाणार नाहीत अशी दुरूस्ती होणे याविषयी दखल घेणे अपेक्षित आहे.
सदर कोल्हापूरी पद्धतीच्या बंधार्यांची दुरूस्ती होत असताना रस्ता आणि बंधारा यांना जोडणारा रस्ता मजबूत आणि टिकाऊ असावा जेणेकरून पाऊस कमी झाल्यानंतर नदीचे पाणी ओसरल्यावर भराव वाहून जाणार नाही आणि तसेच दरवर्षी रस्ता दुरुस्तीची वेळ येणार नाही. याची दक्षता घेणे गरजेचे असल्याचे येथील नागरीक बोलत आहेत. शिवाय निकृष्ट काम करणार्या अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणीही पुढे येऊ लागली आहे.



