मतदार याद्यांतील घोळाविरोधात दिल्लीत इंडीया आघाडीचा मोर्चा; खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांचा उत्स्फूर्त सहभाग

महर्षि डिजीटल न्यूज
नवी दिल्ली : लोकसभेचे विरोधी पक्षनेते खा.राहुल गांधी यांनी निवडणूक मतदार याद्यांतील घोळ उघड केल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. ‘एक मतदार – एक मत’ या संविधानिक मूल्याला तिलांजली देणारे प्रकार अनेक ठिकाणी उघडकीस आले असून, एका मतदाराला अनेक मतांचा लाभ, काल्पनिक मतदारांची नावे यादीत, तसेच प्रत्यक्ष अस्तित्वात असलेल्या मतदारांना यादीतून वगळणे असे प्रकार समोर आले आहेत.

या गंभीर प्रकरणावर केंद्र सरकार व निवडणूक आयोगाने मौन बाळगल्याच्या पार्श्वभूमीवर इंडीया आघाडीच्या सर्व राज्यसभा व लोकसभा खासदारांनी संसद भवनातून निवडणूक आयोग कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्यासह माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी ठळक उपस्थिती लावली. यावेळी इंडिया आघाडीच्या खासदारांबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार सहभागी होते.
खा. मोहिते-पाटील यांनी मतदार यादीतील घोळ हा लोकशाही प्रक्रियेसाठी धोक्याचा इशारा असल्याचे सांगत, “नागरिकांना मताधिकार बजावण्यापासून वंचित ठेवणे हे केवळ अन्यायकारकच नाही, तर संविधानाच्या मूळ तत्वांवर घाला आहे. निवडणूक आयोगाने तातडीने कारवाई करावी, अन्यथा देशभर तीव्र आंदोलन उभारले जाईल,” असा इशारा दिला.
मोर्चादरम्यान इंडीया आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाला निवेदन देऊन मतदार यादीतील त्रुटी त्वरित दुरुस्त करण्याची मागणी केली. दिल्लीच्या रस्त्यांवर ‘मतदारांचा अपमान चालणार नाही’ आणि ‘लोकशाही वाचवा’ अशा घोषणा घुमत होत्या.



