राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त ऐतिहासिक निर्णय चौंडी येथे होणार मंत्रिमंडळाची बैठक ; खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्रात विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी आणि धनगर समाजासह इतर मागासवर्गीय समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्यासाठी, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चौंडी (जि. अहिल्यानगर) येथे मंत्रीमंडळ बैठक आयोजित करण्याची मागणी पत्राद्वारे केली होती.
मध्य प्रदेश सरकारने माहेश्वर (इंदूर) येथे मंत्रीमंडळ बैठक घेऊन अहिल्यादेवी होळकर यांच्या ऐतिहासिक वारशाला सन्मान दिला. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही चौंडी येथे बैठक घेऊन सर्व समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर निर्णय घ्यावा, असे खासदार मोहिते-पाटील यांनी आपल्या निवेदनात सांगितले होते.
आता त्यांच्या या मागणीला यश मिळाले असून, ६५ वर्षांनंतर चौंडी येथे मंत्रीमंडळ बैठक आयोजित होणार आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.