सरसेनापती संताजी घोरपडे स्मारकासाठी आमदार जानकर यांची उपमुख्यमंत्र्यांकडे निधीच्या तरतूदीची मागणी

महर्षि डिजीटल न्यूज/सागर खरात
अकलूज : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील महान सेनानी सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या समाधीस्थळी भव्य स्मारक व शिल्पसृष्टी व्हावी यासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची मागणी माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. या मागणीची दखल घेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पर्यटन विभागाच्या मंत्र्यांना योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
माळशिरस तालुक्यातील मौजे कण्हेर–इस्लामपूर संगमावर सरसेनापती संताजी घोरपडे यांची समाधी आज जीर्ण अवस्थेत आहे. याठिकाणी भव्य स्मारक व्हावे, अशी स्थानिक ग्रामस्थांचीही दीर्घकालीन मागणी आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार जानकर यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली.
या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, छत्रपती संभाजी महाराजांच्या पश्चात काळात औरंगजेबाने स्वराज्य संपवण्यासाठी महाराष्ट्रावर मोठे संकट आणले होते. मात्र, सरसेनापती संताजी व धनाजी यांनी आपल्या पराक्रमाने ते संकट परतवून लावले. संताजी घोरपडे यांनी औरंगजेबाच्या चार लाख सैन्यात घुसून त्याच्या छावणीतील तंबूचे कळस तोडून आणल्याची ऐतिहासिक घटना जनतेच्या मनात स्वराज्याविषयी आशा निर्माण करणारी ठरली.
शंभू महादेवाच्या डोंगर रांगेतील लढाईदरम्यान संताजी घोरपडे यांना दगाफटका झाला आणि १८ जून १६९७ रोजी मौजे कण्हेर-इस्लामपूर संगमावर ओढ्याकाठी त्यांना वीरमरण आले. आज त्या ऐतिहासिक जागेची स्थिती अत्यंत दुर्लक्षित असून, त्याठिकाणी संताजी यांच्या शौर्याला साजेसे स्मारक उभारले जावे, अशी भूमिका आमदार जानकर यांनी मांडली.
“सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या अद्वितीय कार्याचा सन्मान करण्यासाठी कण्हेर–इस्लामपूर संगमावर भव्य स्मारक व शिल्पसृष्टी उभारण्यास शासनाने १० कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा,” अशी ठाम मागणी जानकर यांनी केली आहे.



