अपात्र ठेकेदारासाठी अकलूजच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पायघड्या ; राजकीय दबाव की आर्थिक लागेबांधे? चर्चेला उधाण

महर्षि डिजीटल न्यूज /सागर खरात
अकलूज : अकलूजच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने अपात्र ठेकेदारांना कामे देत असल्याच्या चर्चा सध्या चांगल्याच रंगल्या आहेत. दर्जाहीन कामे, विलंब, तसेच नियमबाह्य पद्धतीने टेंडर मंजूर केल्याचे आरोप होत आहेत. या प्रक्रियेमागे राजकीय दबाव आहे की आर्थिक लागेबांधे, यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अकलूज सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत अनेक विकास प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात टेंडर निघतात. मात्र, काही अपात्र ठेकेदारांना वारंवार कंत्राटे मिळत असल्याने अनेकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर सत्ताधारी पक्षातील राजकीय नेत्यांचा दबाव आहे, की यामागे मोठ्या आर्थिक देवाणघेवाणीचा गैरव्यवहार सुरू आहे, यावर चर्चा सुरू आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सार्वजनिक बांधकाम विभागाने विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी टेंडर नोटीस नंबर 11 प्रमाणे पाच विविध कामांकरिता निविदा प्रसिद्ध केली होती. सदर निविदा अनेक ठेकेदाराने भरलेली असली तरी ती ओपन करण्यापूर्वी भरलेल्या ठेकेदारांपैकी काही ठेकेदार अपात्र असल्याबाबतच्या तक्रारी ठेकेदारांनी केल्या होत्या.
सदर तक्रारीचे कसल्याही प्रकारे दखल न घेता व विशेष म्हणजे सदर निविदा भरलेल्या ठेकेदारांची छाननी अकलूज कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात करणे गरजेचे असताना सोलापूर येथील अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयात ती छाननी करून निविदा ओपन करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याकडून करण्यात आलेल्या या संशयास्पद कृत्यामुळे अनेक प्रकारच्या चर्चांना उधाण आले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी राजकीय दबावापोटी की आर्थिक संगणमतामुळे छाननी सोलापुरात केली तसेच अपात्र ठेकेदारांबाबत सहानुभूती दाखवली असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.