“नारीशक्तीमुळे ३२२५ कुटुंबे होणार स्वावलंबी”; मुख्याधिकारी विकास शिंगाडे यांचे गौरवोद्गार

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
नातेपुते : महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या महिलांसाठीच्या शिलाई मशीन वाटप उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. “उत्सव नारीशक्तीचा” या विशेष अभियानांतर्गत तब्बल ३२२५ महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.
१ मे ते १५ मे या कालावधीत राबविण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये लाभार्थी महिलांकडून केवळ आधार कार्ड घेऊन मशीनचे वितरण करण्यात आले. प्रारंभी ११ मेपर्यंत हा उपक्रम ठेवण्यात आला होता. मात्र महिलांचा वाढता प्रतिसाद आणि आग्रह लक्षात घेता कार्यक्रमाला आणखी चार दिवस मुदतवाढ देण्यात आली. या अतिरिक्त कालावधीतही महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले नातेपुते नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विकास शिंगाडे यांनी आपल्या मनोगतात महिलांच्या सक्षमीकरणासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगितले. “सुखी संसाराचा भक्कम पाया ही कर्तबगार महिला असते. महिलांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचे मोठे काम राजकुमार हिवरकर पाटील यांच्या माध्यमातून होत असून, या शिलाई मशीनमुळे ३२२५ कुटुंबे स्वावलंबी बनतील,” असे ते म्हणाले.
यावेळी नातेपुते पोलीस ठाण्याच्या पीएसआय सोनल मोरे यांनीही महिलांना उद्देशून मार्गदर्शन केले. “५० टक्के सवलतीत उपलब्ध करून दिलेल्या या मशीनमुळे पंचक्रोशीतील महिलांना मोठा फायदा होणार असून, महिला आत्मनिर्भर आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनतील,” असे त्यांनी नमूद केले. तसेच हा उपक्रम यशस्वीपणे राबवल्याबद्दल डॉ. नरेंद्र कवितके यांचेही त्यांनी कौतुक केले.
कार्यक्रमास महात्मा फुले दूध संघाचे चेअरमन रणजितदादा जठार, भारतीय जनता पार्टीचे सुनील बनकर, मनोज जाधव, शिवसेनेचे शहरप्रमुख पोपटराव शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे रियाज शेख, बचत गटाच्या सहयोगिनी सौ. धांहिंजे, सौ. कुलकर्णी मॅडम, सागरदादा भोसले, अजय ढेंबरे, मंगेश कांबळे, विजय ढेंबरे, रामदास बरडकर, संदीप काळे आदी मान्यवर उपस्थित होते.



