Latest News

उत्खननस्थळी प्रशासन पोहोचले; पुन्हा फक्त पंचनामा की थेट धडक कारवाई ? | महर्षि डिजिटल न्यूजचा इम्पॅक्ट !

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात

अकलूज : माळशिरस तालुक्यात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खननाबाबत महर्षि डिजिटल न्यूजने सुरू केलेल्या वृत्तमालिकेची अखेर महसूल प्रशासनाने दखल घेतल्याचे चित्र समोर आले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर आज कचरेवाडी येथील उत्खनन झालेल्या ठिकाणी संबंधित तलाठी आणि कोतवाल यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी घटनास्थळावरील परिस्थितीची नोंद घेत फोटोही काढण्यात आले.

महर्षि डिजिटल न्यूजने कचरेवाडी परिसरातील उत्खनन, त्यावरील कारवाई, कोट्यवधी रुपयांचा ठोठावण्यात आलेला दंड आणि त्यानंतरही सुरू असल्याचे सांगितले जाणारे उत्खनन याबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले आहेत. या वृत्तमालिकेनंतर प्रशासनाच्या हालचालींना वेग आल्याची चर्चा आता तालुक्यात सुरू झाली आहे.

आज झालेल्या पाहणीनंतर मात्र सर्वांचे लक्ष पुढील कारवाईकडे लागले आहे. घटनास्थळी भेट, फोटो आणि नोंदी एवढ्यावरच प्रशासनाची कारवाई थांबणार का? की प्रत्यक्षात नियमांचे उल्लंघन आढळल्यास कठोर कारवाई होणार? हा खरा प्रश्न आहे. 

कारण यापूर्वीही उत्खननासंदर्भात पंचनामे आणि दंडात्मक कारवाई झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे आता करण्यात आलेली पाहणी प्रत्यक्ष कारवाईत रूपांतरित होते की फक्त आणखी काही कागद रंगवले जातात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

दरम्यान, माळशिरस तालुक्यातील इतरही उत्खनन झालेल्या ठिकाणांची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. ही माहिती खरी ठरल्यास तालुक्यातील कथित अवैध गौण खनिज उत्खननाच्या प्रकरणात मोठी कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तालुक्यात अनेक ठिकाणी मुरूम, दगड आणि खडीसाठी मोठ्या प्रमाणावर उत्खनन होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे केवळ एखाद्या एका ठिकाणापुरती कारवाई न करता संपूर्ण तालुक्यातील संशयित उत्खननस्थळांची सखोल तपासणी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!