उत्खनन व खडी क्रशरवाल्यांची मोठी लॉबिंग; शिपाई-ड्रायव्हरमार्फत अधिकाऱ्यांशी ‘सेटिंग’? महर्षि डिजिटल न्यूजच्या वृत्तमालिकेचा दुसरा भाग

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
अकलूज : माळशिरस तालुक्यात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खननाच्या गोरखधंद्याबाबत महर्षी डिजिटल न्यूजने सुरू केलेल्या वृत्तमालिकेच्या आजच्या दुसऱ्या भागात अत्यंत गंभीर आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. तालुक्यातील अनेक भागांत मुरूम तसेच खडीसाठी लागणाऱ्या दगडांचे मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरू असताना प्रशासनाला याची माहितीच नसते, असे म्हणणे कठीण आहे. मग सर्व काही माहिती असूनही हे अवैध उत्खनन सुरूच कसे राहते? हा प्रश्न आता अधिक गंभीर बनला आहे.
माळशिरस तालुक्यातील विविध भागांत मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारी आणि चर्चा असतानाही कारवाईचा वेग मात्र अत्यंत संथ असल्याचे चित्र दिसून येते. कारवाई झालीच तर ती काही ठिकाणी केवळ औपचारिकतेपुरती मर्यादित राहत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
या संपूर्ण प्रकाराची कारणमीमांसा करण्याचा प्रयत्न केला असता अधिकारी आणि खडी क्रशर अथवा उत्खनन करणाऱ्यांमध्ये ‘सेटिंग’ असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
या चर्चेनुसार, संबंधितांपर्यंत थेट पोहोचण्याऐवजी काही ठिकाणी अधिकारी वर्गाशी संपर्क साधण्यासाठी शिपाई किंवा वाहनचालकांचा माध्यम म्हणून वापर केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. आधी ‘प्रोटोकॉल’ पूर्ण केला जातो आणि त्यानंतर संबंधित उत्खननाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते, अशी गंभीर चर्चा तालुक्यात रंगली आहे. आज मात्र, या आरोपांची अधिकृत पातळीवर अद्याप पुष्टी झालेली नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे.
अवैध उत्खननाचा हा प्रकार केवळ एखाद्या व्यक्तीपुरता मर्यादित नसून, स्थानिक पातळीपासून तालुका पातळीपर्यंत काही अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संबंधितांची लागेबांधे असल्याचा आरोपही केला जात आहे. एका बाजूला शासनाकडून गौण खनिजाच्या अवैध उत्खननाला आळा घालण्यासाठी नियम आणि कारवाईची तरतूद आहे. दुसऱ्या बाजूला प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारी होत आहेत. त्यामुळे ‘अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई कोण करणार आणि कारवाई करणाऱ्यांवर देखरेख कोण ठेवणार?’ असा सवाल उपस्थित होत आहे.
प्रशासनातील काही घटकांशीच जर संबंधितांची जवळीक असल्याचा आरोप होत असेल, तर अशा परिस्थितीत निष्पक्ष कारवाई कशी होणार? हा माळशिरसच्या जनतेसमोर उभा राहिलेला मोठा प्रश्न आहे.
माळशिरस तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खननाचा हा प्रकार केवळ बातमीपुरता मर्यादित न ठेवता, या संपूर्ण यंत्रणेच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न ‘महर्षि डिजिटल न्यूज’ करणार आहे. महर्षि डिजिटल न्यूजच्या या वृत्तमालिकेतून या प्रश्नांचा शोध सुरूच राहणार आहे.



