कचरेवाडीत उत्खनने गाठली परिसीमा प्रशासनाचा धाक संपला की ‘प्रोटोकॉल’ चे अभय ?

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
भाग 3
अकलूज : माळशिरस तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खननाने आता परिसीमा गाठल्याचे चित्र समोर येत आहे. प्रशासनाकडून कारवाई होऊन दंड ठोठावण्यात आल्याची माहिती असतानाही कचरेवाडी परिसरात उत्खनन सुरूच असल्याच्या चर्चेमुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. उत्खनन करणाऱ्यांना प्रशासनाचा अजिबात धाक राहिलेला नाही का, की या सर्वामागे काही वेगळे समीकरण आहे, याबाबत तालुक्यात उघडपणे चर्चा सुरू आहे.
महर्षी डिजिटल न्यूजने माळशिरस तालुक्यात सुरू असलेल्या कथित अवैध उत्खननाविरोधात वृत्तमालिका सुरू केल्यानंतर दररोज नवनवीन आणि आश्चर्यकारक माहिती समोर येत आहे. या मालिकेतील आणखी एक गंभीर प्रकरण आता कचरेवाडी येथून पुढे आले आहे. स्थानिक पातळीवर मिळत असलेल्या माहितीनुसार, येथे गेल्या सुमारे दोन वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर मुरूम, दगड अशा गौण खनिजाचे उत्खनन सुरू असल्याचे दिसून येत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर काम सुरू असताना संबंधित महसूल यंत्रणेला याची माहिती नाही का याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.
या प्रकरणात दंडात्मक कारवाई झाल्याची माहिती असतानाही उत्खननाचा प्रकार थांबला नसल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे कारवाई नेमकी कागदावरच झाली का? दंड न भरता पुन्हा उत्खनन करण्याची मुभा मिळते का? आणि दंडानंतरही काम सुरू राहण्यामागे नेमके कोणाचे पाठबळ आहे? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
कचरेवाडीतील या प्रकरणाकडे संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसील प्रशासनाचे दीर्घकाळ दुर्लक्ष झाल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. उत्खननाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बदल होत असताना संबंधित यंत्रणा नेमकी काय करत होती, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. दोन वर्षांच्या कालावधीत या ठिकाणाची पाहणी झाली का? उत्खननासाठी आवश्यक परवानग्या तपासण्यात आल्या का? आणि नियमांचे उल्लंघन झाले असल्यास कठोर कारवाई का करण्यात आली नाही? याची उत्तरे आता प्रशासनाने देणे आवश्यक आहे.
विशेष म्हणजे, अवैध उत्खननाच्या मुद्द्यावर संपूर्ण तालुक्यात नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शासनाचा महसूल बुडवून आणि पर्यावरणाचे नुकसान करून जर काही जण खुलेआम उत्खनन करत असतील आणि कथित कारवाईनंतरही हा प्रकार सुरू राहत असेल, तर कायद्याचा धाक नेमका कुणावर राहिला आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
कचरेवाडीतील कथित अवैध उत्खननाची संपूर्ण वस्तुस्थिती, कारवाईची पार्श्वभूमी आणि या प्रकरणातील धक्कादायक बाबींचा सविस्तर आढावा महर्षि डिजिटल न्यूजच्या उद्याच्या स्पेशल रिपोर्टमध्ये घेण्यात येणार आहे. नक्की वाचा अवैध उत्खननाच्या मालिकेतील चौथा भाग.



