Latest News

रस्ते उद्ध्वस्त, धुळीने हैराण, नागरिकांचा जीव धोक्यात ; ओव्हरलोड खडी-मुरूम वाहतुकीचा हैदोस कचरेवाडी परिसरात

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात 

भाग ५

अकलूज : कचरेवाडी परिसरात खडी, मुरूम, दगड आदी गौण खनिजांची मोठ्या प्रमाणावर अहोरात्र वाहतूक सुरू असल्याने स्थानिक नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. जड वाहनांच्या सततच्या ये-जा, ओव्हरलोड वाहतूक, धुळीचे साम्राज्य आणि रस्त्यांची झालेली दुरवस्था यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

स्थानिक नागरिकांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार, कचरेवाडी परिसरातील रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात ट्रक, ट्रॅक्टर आणि टिपरद्वारे खडी, मुरूम व दगडांची वाहतूक केली जात आहे. या वाहनांची दिवसरात्र सुरू असलेली वर्दळ परिसरातील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. विशेषतः लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिकांना धुळीमुळे त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.

या वाहतुकीत काही वाहने ओव्हरलोड असल्याचा तसेच काही वाहनांवर क्रमांक नसल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे या वाहनांची तपासणी कोण करणार? वाहतुकीच्या नियमांचे पालन होत आहे का? आणि अशा वाहनांवर कारवाई का होत नाही? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

वाहतुकीचा आणखी एक गंभीर मुद्दा म्हणजे जड वाहनांचा वेग. ट्रक, ट्रॅक्टर आणि टिपर चालक कर्कश आवाजात टेपरेकॉर्डरवर गाणी लावत अतिवेगाने वाहनांची ये-जा करत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे परिसरात अपघाताची भीतीही वाढली आहे. अरुंद रस्त्यांवरून मोठ्या वेगाने धावणाऱ्या या जड वाहनांमुळे नागरिकांना रस्त्यावरून चालणेही धोकादायक बनल्याची परिस्थिती आहे.

सततच्या जड वाहतुकीमुळे परिसरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, वाहनांच्या चाकांमुळे उडणाऱ्या धुळीने रस्त्यालगतच्या घरांपर्यंत धुळीचे लोट पोहोचत आहेत. पावसाळ्यात चिखल आणि उन्हाळ्यात धूळ, अशा दुहेरी समस्येला कचरेवाडीतील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.

गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्यांचा व्यवसाय सुरू आहे; मात्र त्याची किंमत स्थानिक नागरिकांना आपल्या आरोग्याने आणि खराब रस्त्यांच्या रूपाने मोजावी लागत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया परिसरातून उमटत आहे.

आता या प्रकरणात महसूल विभागासह वाहतूक, पोलीस आणि संबंधित प्रशासनाने लक्ष घालून वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करावी, ओव्हरलोड व नियमबाह्य वाहनांवर कारवाई करावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!