अवैध उत्खननाने माळशिरस तालुका पोखरला; महसूल प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
भाग १
अकलूज : माळशिरस तालुक्यात मुरूम, खडी आणि बांधकामासाठी लागणाऱ्या दगडांचे अवैध उत्खनन मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. नियम धाब्यावर बसवून मोठमोठ्या क्वारी खोदल्या जात असून, काही ठिकाणी चक्क छोटे-मोठे डोंगर पोखरले जात आहेत. मात्र, या गंभीर प्रकाराकडे महसूल प्रशासन आणि गौण खनिज विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.
तालुक्यातील चाकोरे, तरंगफळ, कचरेवाडी, गिरझणी, उघडेवाडी यासह अनेक गावांमध्ये मुरूम आणि दगडांचे उत्खनन सुरू असल्याची चर्चा आहे. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमिनीची चाळण करून मुरूम बाहेर काढला जात आहे, तर काही भागांत दगड आणि खडीसाठी डोंगरांचे अक्षरशः लचके तोडले जात असल्याचे चित्र आहे.
अवैध उत्खननाबाबत प्रशासनाकडून अधूनमधून कारवाई केली जात असल्याचे सांगितले जाते. मात्र, ही कारवाई केवळ कागदोपत्री किंवा थातूरमातूर स्वरूपाची ठरत असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. कारवाईनंतरही संबंधित ठिकाणी पुन्हा उत्खनन सुरू होत असेल, तर प्रशासनाच्या कारवाईचा धाक नेमका कुठे आहे? असा सवाल उपस्थित होत आहे.
अवैध उत्खननामुळे शासनाचा महसूल बुडण्याबरोबरच परिसरातील नैसर्गिक साधनसंपत्तीचे मोठे नुकसान होत आहे. जमिनीचा पोत, नैसर्गिक जलप्रवाह आणि पर्यावरणावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा केवळ महसुलाचा प्रश्न नसून पर्यावरण आणि भविष्यातील पिढ्यांच्या दृष्टीनेही गंभीर विषय आहे.
माळशिरस तालुक्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरू असल्याची चर्चा असताना संबंधित यंत्रणा नेमकी काय करत आहे? उत्खननासाठी परवानगी आहे का? परवानगीच्या मर्यादेपेक्षा अधिक उत्खनन होत आहे का? उत्खनन केलेला मुरूम आणि दगड नेमका कुठे जात आहे? या सर्व बाबींची सखोल चौकशी होण्याची गरज आहे.
कारवाईच्या नावाखाली केवळ पंचनामे करून किंवा दंडाची औपचारिकता पूर्ण करून प्रश्न सुटणार नाही. अवैध उत्खननाला आळा घालायचा असेल, तर उत्खनन करणाऱ्यांसह त्यांना पाठबळ देणाऱ्या यंत्रणेचीही जबाबदारी निश्चित करण्याची गरज आहे.
माळशिरस तालुक्यात सुरू असलेल्या या अवैध उत्खननाच्या प्रकारावर ‘महर्षि डिजिटल न्यूज’ लक्ष ठेवून आहे, तालुक्यातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या अवैध उत्खननाचा वस्तुनिष्ठ पद्धतीने मालिकेच्या स्वरूपात वृतांत आपल्यासमोर मांडण्याचा आणि प्रयत्न करणार आहोत.



