निवडणुकीतील पराभवाचा राग; अकलूजमध्ये लोखंडी रॉड-काठ्यांनी हल्ला, सोन्याची चैन हिसकावल्याचा आरोप ; अकलूज पोलिसात गुन्हा दाखल

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
अकलूज : निवडणुकीतील पराभवाचा राग मनात धरून फिर्यादीसह त्यांच्या साथीदारांवर लोखंडी वस्तू व काठ्यांनी हल्ला करून मारहाण केल्याप्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात सात जणांसह अन्य अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत मारहाण, शिवीगाळ, दमदाटी, सोन्याची चैन हिसकावणे तसेच दुचाकीचे नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याबाबत संगम, ता. माळशिरस येथील रहिवासी व सध्या गुळवे नगर, अकलूज येथे वास्तव्यास असलेले रणजीत सुभाष महाडिक (वय 38) यांनी अकलूज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 ऑगस्ट 2026 रोजी अकलूज येथे ही घटना घडली. निवडणूक हरल्याचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादी रणजीत महाडिक यांच्यासह बाळू संपत्ती जाधव, अमर सुभाष महाडिक आणि पृथ्वीराज जाधव यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणात ऋतुराज गायकवाड (वय 27), बाळकृष्ण निवृत्ती गायकवाड (वय 32), विठ्ठल निवृत्ती गायकवाड (वय 28), अमरसिंह गायकवाड (वय 33, सर्व रा. आनंदनगर, ता. माळशिरस), सौरभ (पूर्ण नाव माहित नाही, वय 22, रा. अकलूज), सागर जगदाळे (वय 24, रा. सराटी, ता. इंदापूर, जि. पुणे), नामा (पूर्ण नाव माहित नाही, वय 28, रा. अकलूज) यांच्यासह अन्य अंदाजे 15 ते 20 अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी लोखंडी वस्तू व काठ्यांनी मारहाण करून संबंधितांना जखमी केले. तसेच हाताने चापट मारून शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप आहे. यावेळी सुमारे दोन तोळे वजनाची सोन्याची चैन काढून घेतल्याचा तसेच दुचाकीची तोडफोड करून नुकसान केल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 573/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम 115(2), 118(1), 119(1), 190, 191(2), 191(3), 324(4), 351(2) आणि 352 तसेच संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेतील आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती असून, या प्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल पठाण करीत आहेत.



