करकंब-मोडनिंब नगरपंचायतीच्या मागणीला वेग ; आ. अभिजीत पाटलांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील करकंब आणि मोडनिंब ग्रामपंचायतींचे नगरपंचायतीत रूपांतर करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या मागणीला आता वेग आला असून, आमदार अभिजीत पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन याबाबत निवेदन सादर केले.
करकंब आणि मोडनिंब परिसरातील नागरिकांकडून ग्रामपंचायतींचे नगरपंचायतीत रूपांतर करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. मात्र, दीर्घकाळ या मागणीवर निर्णय न झाल्याने अखेर करकंब नगरपंचायतीच्या स्थापनेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.
या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने करकंब नगरपंचायतीबाबत आवश्यक कार्यवाही पूर्ण करून तीन महिन्यांच्या आत निर्णय घेण्याचे स्पष्ट निर्देश शासनाला दिले आहेत. या न्यायालयीन निर्देशांच्या पार्श्वभूमीवर आमदार अभिजीत पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन प्रकरणाची तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.
करकंब ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्यासाठी आवश्यक असलेली प्राथमिक अधिसूचना तातडीने मंजूर करून प्रसिद्ध करावी. तसेच, त्यानंतरची सर्व वैधानिक प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करून नगरपंचायतीच्या स्थापनेचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, अशी ठाम मागणी आ. पाटील यांनी केली.
करकंब आणि मोडनिंब परिसराच्या वाढत्या लोकसंख्येसह नागरी सुविधांची गरज लक्षात घेता नगरपंचायतीचा दर्जा मिळणे विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. नागरिकांचे दीर्घकाळचे स्वप्न आणि उच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश लक्षात घेऊन शासनाने या प्रकरणी तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंतीही आ. अभिजीत पाटील यांनी केली.
करकंब-मोडनिंबच्या विकासाला गती देणारा हा निर्णय लवकरात लवकर व्हावा, यासाठी शासनस्तरावर आपला पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी सांगितले.



