कौटुंबिक छळ, मारहाणीचे आरोप ठरले खोटे? ; ॲड.सुमित सावंत यांच्या युक्तिवादाने प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात
माळशिरस : सन २०१९ मध्ये दाखल करण्यात आलेल्या कौटुंबिक छळ प्रकरणात माळशिरस येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय क्रमांक ४ यांनी महत्त्वपूर्ण निकाल देत सर्व सहा आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. न्यायालयाने उपलब्ध पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि तपासातील त्रुटींचा सखोल विचार करून अभियोजन पक्षाला आरोप सिद्ध करण्यात अपयश आल्याचे नमूद केले.
सदर प्रकरणाची सुनावणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एम. जे. गायकवाड यांच्या न्यायालयात झाली. या प्रकरणात भारतीय दंड संहिता कलम ४९८(अ), ३२३, ५०४, ५०६, ५०७, ५०९ सह कलम ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यात अनिल प्रल्हाद माळवदे, प्रल्हाद राजाराम माळवदे, सुनील प्रल्हाद माळवदे, मंगल प्रल्हाद माळवदे, पूजा सुनील माळवदे आणि कृष्णा बळीराम नेटके यांचा आरोपी म्हणून समावेश होता.
फिर्यादी महिलेने पती व सासरच्या मंडळींकडून मानसिक व शारीरिक छळ, मारहाण, शिवीगाळ तसेच विनयभंग केल्याचे आरोप केले होते. या प्रकरणात फिर्यादीसह एकूण सात साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये फिर्यादीचे नातेवाईक, तपासी अधिकारी तसेच इतर साक्षीदारांचा समावेश होता.
सुनावणीदरम्यान आरोपींच्या वतीने ॲड. सुमित सावंत यांनी प्रभावी युक्तिवाद सादर केला. फिर्यादीच्या जबाबात आरोपींविरुद्ध कोणताही ठोस, स्वतंत्र आणि विश्वासार्ह पुरावा नसल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच तपास यंत्रणेकडून घटनास्थळ पंचनामा करताना झालेल्या त्रुटी, स्वतंत्र साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले नसल्याचे मुद्दे आणि साक्षीदारांच्या जबाबांमधील गंभीर विसंगती याकडेही बचाव पक्षाने न्यायालयाचे लक्ष वेधले.
आरोपींविरुद्धचा गुन्हा संशयाच्या पलीकडे सिद्ध होत नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाकडून करण्यात आला. न्यायालयानेही उपलब्ध पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांचा विचार करून अभियोजन पक्षाची बाजू विश्वासार्ह वाटत नसल्याचे निरीक्षण नोंदविले.
परिणामी, संशयाचा फायदा देत न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त करण्याचा आदेश दिला.



