Latest News

सीना-माढा उपसा सिंचन योजनेत सात गावांचा समावेश करा; आ. अभिजीत पाटील यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

महर्षि डिजीटल न्यूज | सागर खरात 

पंढरपूर : सीना-माढा उपसा सिंचन योजनेत तुळशी, बावी, अंजनगाव (खे.), परीतेवाडी, कुर्डू, पिंपळखुंटे आणि अंबाड या सात गावांचा समावेश करण्यात यावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी माढा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली आहे.

सद्यस्थितीत या सात गावांतील पाणीपुरवठ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून, या गावांना सीना-माढा उपसा सिंचन योजनेशी जोडल्याशिवाय पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार नाही, असे आ. पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिले.

यावेळी माढा मतदारसंघातील विविध विकासकामे आणि प्रलंबित प्रश्नांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. आवश्यक निधी उपलब्ध करून देणे तसेच विविध कामांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबत आ. अभिजीत पाटील यांनी पत्राद्वारे मागणी केली.

माढा तालुक्यातील तब्बल १६९ पाझर तलावांचे साठवण तलावांमध्ये रूपांतर करण्यात यावे, अशीही महत्त्वाची मागणी यावेळी करण्यात आली. या माध्यमातून पावसाचे पाणी अधिक प्रभावीपणे अडवता येईल, भूजल पातळीत वाढ होईल आणि भविष्यातील सिंचनासाठी दीर्घकालीन जलसाठा निर्माण होण्यास मदत होईल, असे आ. पाटील यांनी नमूद केले.

सीना-माढा उपसा सिंचन योजनेच्या आधुनिकीकरणाचाही महत्त्वाचा मुद्दा आ. अभिजीत पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर मांडला. सध्या वापरात असलेल्या १५०० एचपी क्षमतेच्या मोटारींच्या जागी सुमारे ३००० एचपी क्षमतेच्या मोटारी बसविणे, पंपिंग यंत्रणा सक्षम करणे आणि आवश्यक पाईपलाईनचा विस्तार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

या सुधारणा केल्यास अधिकाधिक गावांपर्यंत आणि मोठ्या शेती क्षेत्रापर्यंत पाणी पोहोचविणे शक्य होणार असून, मतदारसंघातील शेतीच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रशासकीय सुविधांबाबतही आ. पाटील यांनी महत्त्वाच्या मागण्या मांडल्या. पंढरपूर तालुक्यातील गावांसाठी आवश्यक त्या ठिकाणी ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी कार्यालये उपलब्ध करून द्यावीत, जेणेकरून नागरिकांना महसूलविषयक सेवा स्थानिक पातळीवरच मिळू शकतील, अशी मागणी करण्यात आली.

तसेच करकंब येथे अपर तहसील कार्यालय आणि दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली. ही कार्यालये सुरू झाल्यास परिसरातील नागरिकांची सध्याची गैरसोय मोठ्या प्रमाणात दूर होणार आहे.

शेतकऱ्यांच्या दैनंदिन गरजा आणि शेतीमालाच्या वाहतुकीचा प्रश्न लक्षात घेऊन पाणंद रस्त्यांसाठी एकूण ७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही आ. पाटील यांनी केली. पाणंद रस्ते सक्षम झाल्यास शेतकऱ्यांना शेतीपर्यंत पोहोचणे, शेतीमालाची वाहतूक करणे आणि बाजारपेठेशी जोडले जाणे अधिक सुलभ होणार आहे.

याशिवाय माढा आणि पंढरपूर तालुक्यातील विविध गावांमध्ये सुसज्ज स्मशानभूमी तसेच इतर आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची विनंतीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली.

एकूणच, पाणी, सिंचन, शेती, रस्ते, महसूल प्रशासन आणि ग्रामीण मूलभूत सुविधा अशा विविध प्रश्नांचा सखोल अभ्यास करून प्रत्येक प्रश्नामागील नेमकी गरज, आवश्यक निधी, प्रशासकीय प्रक्रिया आणि भविष्यातील परिणाम लक्षात घेऊन आ. अभिजीत पाटील यांचा शासनस्तरावर सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू असल्याचे या भेटीतून दिसून आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!