इस्लामपूर येथे आदर्श मुख्याध्यापक व शिक्षकांचा नागरी सत्कार

महर्षि डिजीटल न्यूज / सागर खरात
अकलूज : पंचायत समिती माळशिरस यांच्या वतीने नुकतेच (शनिवार, दि. 29 मार्च 2025) आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण पार पडले. या गौरव सोहळ्यात इस्लामपूर गावचे सुपुत्र विजय देशमुख यांना आदर्श मुख्याध्यापक व संतोष महामुनी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या यशस्वी गौरवाबद्दल सिद्धनाथ व जोगेश्वरी मंदिर, इस्लामपूर येथे भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला. विजय देशमुख यांचा सपत्नीक सत्कार रत्न शिव पवार यांच्या हस्ते संपन्न झाला, तर संतोष महामुनी यांचा सत्कार इस्लामपूर गावाचे माजी सरपंच साहेबराव देशमुख यांच्या शुभहस्ते पार पडला.
सत्कार समारंभात उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना पुरस्कार विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना विजय देशमुख व संतोष महामुनी यांनी हा पुरस्कार मिळाल्यामुळे अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त केली.
या समारंभाला श्री धनंजय देशमुख, माणिकराव देशमुख, दगडू देशमुख, संजय देशमुख, निलेश देशमुख, सुहास देशमुख, डॉ. सचिन देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.