बेपत्ता असलेल्या 27 जणांचा शोध घेण्यास अकलूजच्या उपविभागीय पोलिस कार्यालयाला यश ; डीवायएसपी नारायण शिरगांवकर यांनी राबविली विशेष मोहिम

महर्षि डिजीटल न्यूज / सागर खरात
अकलूज : अकलूज उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या विशेष पथकाने चार दिवसांत बेपत्ता असलेल्या 27 व्यक्तींचा यशस्वी शोध लावून एक मोठी कामगिरी बजावली आहे. सन 2024 आणि 2025 मधील प्रलंबित बेपत्ता प्रकरणांवर लक्ष केंद्रित करून ही विशेष मोहिम 2 एप्रिल ते 5 एप्रिल 2025 या कालावधीत राबवण्यात आली.
ही मोहिम सोलापूर ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी या मोहिमेचे नेतृत्व करताना अकलूज, माळशिरस, नातेपुते आणि वेळापूर या पोलीस ठाण्यांमधून विशेष पथकांची नियुक्ती केली होती.
तपास करत असताना 2024 मधील 35 प्रलंबित प्रकरणांपैकी 14 व्यक्ती व 2025 मधील 25 प्रलंबित प्रकरणांपैकी 13 व्यक्ती अशा एकुण 60 स्त्री/पुरूषांपैकी 27 स्त्री/पुरुषांचा शोध लावण्यात अकलूज उपविभागाला यश मिळाले आहे. या मोहिमेतील विशेष कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांनी पथकाचे अभिनंदन करत बक्षिसाची घोषणाही केली आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगांवकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष विशेष पथकामध्ये मोलाची भुमीका बजावलेल्यांमध्ये अकलूज पोलीस ठाण्याकडील पोसई वनवे, पोहेकाँ कुंभार, पोहेकाँ बागडे, पोहेकाँ गुरव, पोहेकाँ पोरे, माळशिरस पोलीस ठाण्याकडील पोसई पवार, पोहेकाँ थोरात, पोहेकाँ शिंदे, पोहेकाँ परांडे, पोना खरात, वेळापूर पोलीस ठाण्याकडील पोसई रेगुडे, पोहेकाँ पाटील, पोकाँ पांढरे, पोहेकाँ मेहरकर, नातेपुते पोलीस ठाण्याकडील पोसई ओमासे, पोना लोहर, पोकाँ कुलकर्णी, पोकाँ बोंदर यांचा समावेश आहे.
या मोहिमेमुळे अनेक कुटुंबांना आपल्या हरवलेल्या सदस्यांचा शोध लागल्याने हळूहळू आशेचा किरण पुन्हा दिसू लागला आहे. अशा प्रकारच्या योजनाबद्ध मोहिमा सातत्याने राबविल्या गेल्यास अनेक प्रलंबित बेपत्ता प्रकरणांची उकल होण्यास मदत होईल.