थकीत पाणीपट्टी, घरपट्टी भरा अन्यथा जप्तीची कारवाई ; अकलूज नगरपरिषदेकडून मालमत्ता धारकांना नोटीसा
महर्षि डिजीटल न्यूज
अकलूज : शहरातील थकीत पाणीपट्टी आणि घरपट्टी वसूल करण्यासाठी अकलूज नगरपरिषदेने कडक पावले उचलली असून, थकबाकीदार मालमत्ता धारकांना जप्तीच्या कारवाईच्या नोटीसा पाठवल्या आहेत. थकबाकीदारांनी त्वरित कर भरणा करावा, अन्यथा त्यांच्या मालमत्तेवर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी प्रसिध्दीसाठी दिलेल्या पत्रकाच्या माध्यमातून दिला आहे.
अकलूज नगरपरिषद हद्दीतील अनेक मालमत्ता धारकांनी वर्षानुवर्षे पाणीपट्टी आणि घरपट्टी थकवली आहे. त्यामुळे नगरपरिषदेच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होत असून, मूलभूत सुविधा पुरवण्यास अडचणी येत आहेत. कर वसुली न झाल्यास शहरातील पायाभूत सुविधा आणि विकास कामांवर विपरीत परिणाम होऊ शकतो, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
तत्पुर्वी अकलूज नगरपरिषद हद्दीतील मालमत्ता धारकांना दि.28 जानेवारी रोजी वॉर्ड क्र.2 मध्ये 6 मालमत्ता धारकांचे नळ बंद करण्यात आले असून 10 थकीत मालमत्ता धारकांना जप्तीपुर्व नोटीस देण्यात आली आहे. तसेच जिओ टॉवर्स व रिलायन्स टॉवर्स यांना जप्तीपूर्वीची नोटीस देण्यात आली आहे.
पुढील काळात वेळेत थकीत रक्कम न भरल्यास मालमत्ता जप्त करणे, गाळे ताब्यात घेणे अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी सांगितले आहे. कारवाई टाळण्यासाठी सर्व मालमत्ता धारक व नळ कनेक्शन धारक यांनी आपली थकीत व चालू घरपट्टी व पाणीपट्टी तात्काळ भरून सहकार्य करावे असे आवाहनही मुख्याधिकार्यांनी केले आहे.