बंदूकधारकांवर कारवाईचा अजित पवार यांचा बीड मध्ये इशारा ; माळशिरस तालुक्यातील राम सातपुते यांच्या समर्थकांवरही कारवाई होणार का? नागरीकांचा सवाल
महर्षि डिजीटल न्यूज / सागर खरात
अकलूज : सार्वजनिक ठिकाणी बंदुकांचा धाक दाखवत फिरणार्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल बीड मध्ये दिले आहेत. त्यांनी जाहीरपणे सांगितले की, अशा व्यक्तींची शस्त्र परवाने (लायसन्स) रद्द करण्यात येतील. मात्र, माळशिरस तालुक्याचे माजी आमदार राम सातपुते यांचे काही समर्थकदेखील बंदूक लावून फिरत असल्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे आता पवार हे सातपुते यांच्या समर्थकांवरही कारवाई करतील का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राजकीयदृष्ट्या सुसंस्कृत असलेल्या माळशिरस तालुक्यात सध्या राजकीय वातावरण जाणूनबुजून तापवले जात असतानाच माजी आमदार राम सातपुते यांच्या समर्थकांकडून कंबरेला बंदुका लावल्याच्या व्हायरल फोटोतून दहशतीचे प्रकार उघडकीस येत आहेत. या प्रकारामुळे तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, राजकीय संस्कृतीवर याचा गंभीर परिणाम होत असल्याचे बोलले जात आहे. सोशल मिडीयात याबाबत सुरू असलेल्या चर्चेत माजी आमदार राम सातपुते यांचे कार्यकर्ते आणि समर्थक इतरांवर दबाव टाकण्यासाठी खुलेआम शस्त्रे बाळगू लागले आहेत. गावोगावी फिरताना किंवा ठराविक ठिकाणी हे लोक बंदुकांसह वावरताना दिसत आहेत. त्यामुळे अनेक सामान्य नागरिक भयभीत झाले असून, कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे तालुक्यातील शांतता धोक्यात येऊ शकते, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या एका पोस्ट मध्ये तर, गुन्हेगारीसाठी कुप्रसिद्ध असणार्या बीड जिल्ह्यातून माळशिरस ला आलेले माजी आमदार राम सातपुते माळशिरस तालुक्यात आका संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न करत आहेत. बगल बच्च्यांना कमरेला बंदूकी देऊन नेमका काय संदेश राम सातपुते देऊ पाहत आहेत? राम सातपुतेंच्या जवळपास आठ ते दहा जवळच्या लोकांकडे बंदुका असल्याचे बालले गेले आहे तर खुलेआमपणे दहशत माजवणारी टोळी सातपुतेनी तयार केलीय आणि त्या टोळीचा ‘आका’ राम सातपुते आहेत. बाहेरून येणारी लोकं माळशिरस तालुक्यात दहशत निर्माण करत आहेत. गुंडागर्दी करत आहेत. माळशिरस मध्ये वाल्मिक कराड सारखी लोकं निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. माळशिरस मधील तरुणांची माथी भडकवण्याचे काम सातपुते करत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
माळशिरस तालुका हा पारंपरिक राजकीय चालीरीतींसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, सध्याच्या घडामोडींमुळे येथे दहशतीचे राजकारण सुरू झाल्याची टीका होत आहे. माळशिरसच्या शांततेला कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड प्रमाणेच माळशिरस तालुक्यातही कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी प्रशासनाला घेण्याचे आदेश द्यावेत. तसेच याबाबत भारतीय जनता पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांनीही याप्रकरणाकडे लक्ष घालून अशा प्रवृत्तींना वेळीच आळा घालावा अशी मागणी करण्याबरोबरच सदरच्या बंदुका अधिकृत आहेत की अनधिकृत याचाही तपास करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येऊ लागली आहे.